होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील माकडताप साथीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल 

सिंधुदुर्गातील माकडताप साथीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल 

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:01PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडतापाच्या वाढत्या तीव्रतेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. रशियातील प्रख्यात संस्था कंझ्युमर वॉचडॉग रोस्पॉट्रेब्नाड्जोरने सिंधुदुर्ग विशेषतः कोकण पट्ट्यात जाणार्‍या विदेशी पर्यटकांना माकडतापाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान 2016 पासून माकडतापाने 19 लोकांचे बळी गेले असून 332 जणांना या तापाची लागण झाली असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

2016 मध्ये दोडामार्ग तालुक्यातील केर गावात माकडतापाचा पहिला रुग्ण सापडल्यावर राज्याची आरोग्य यंत्रणा हादरली होती. मात्र, या तापावर नियंत्रण ठेवण्यात  आरोग्य यंत्रणा हतबल ठरल्याने गेल्या दोन वर्षांत माकडतापाचा प्रकोप वाढतच राहिल्याने अनेकांचे बळी गेले आहेत. फेब्रुवारीनंतरच्या उष्म्यात हा ताप जीवघेणे रूप धारण करत थैमान घालत असतानाच व गेली दोन वर्षे या तापाची तीव्रता डोळ्यासमोर असूनही राज्यशासन याबाबत फारसे गंभीर नाही. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या माकडतापाच्या प्रकोपाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

रशियातील प्रख्यात संस्था कंझ्युमर वॉचडॉग रोस्पॉट्रेब्नाड्जोरने आपल्या संकेतस्थळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडतापाच्या साथीबाबत एक अहवाल प्रकाशित केला असून यात माकडतापाने गेलेले बळी व बाधितांबाबत माहिती देण्यात आली आहे. 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थेने या माकडतापाला पब्लिक हेल्थ अलर्ट म्हणून घोषित केले असल्याने विदेशी पर्यटकांनी सिंधुदुर्ग विशेषतः कोकण पट्ट्यात जाताना सावधगिरी बाळगावी, माकडतापाची तीव्रता जास्त असताना शक्यतो या पट्ट्यात जाऊ नये, असा इशारा या संस्थेने दिला आहे.

2 वर्षांत 19 बळी, 332 जणांना लागण 

येथील आरोग्य यंत्रणेने माकडताप आटोक्यात आणण्यासाठी कितपत प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय असतानाच या तापाने गेलेले बळी व बाधितांची संख्या जाहीर करून आरोग्य विभागाने नेहमीप्रमाणे आकडेवारीचे काम पूर्ण केले आहे.2016 पासून या तापाने दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात 19 बळी घेतले असून 332 जणांना लागण या तापाची लागण झाली आहे. 50 हजार लोकांना माकडतापाची लस देण्यात आली असून 1 लाख लोकांना लवकरात लवकर ही लस देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.

जीवघेण्या तापावर नेमका उपाय कधी?

नॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ वायरोलॉजी या संस्थेने या माकडताप हा  बायोसेप्टीक श्रेणी 1 मधील सर्वाधिक धोकादायक ताप असल्याचे स्पष्ट केल्यावरही येथे थैमान घालणार्‍या माकडतापाबाबत राज्य शासन पुरेसा संवेदनशील नसल्याचे स्पष्ट आहे.गतवर्षी माकडतापाचा जास्त प्रभाव असलेल्या भागात 7 कोटीची प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा अद्याप कागदावरच आहे. त्याशिवाय सद्या माकडतापावर देण्यात येणारी लस ही 1960 च्या लसीचे आऊटडेटेड व्हर्जन आहे. ही लस देऊनही माकडतापाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले होते.त्यामुळे माकडतापावर लसीकरण करण्यात आले आहे, अशा शब्दात पाठ थोपटून घेणारा राज्याचा आरोग्य विभाग या जीवघेण्या तापावर नेमका उपाय कधी शोधणार या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.