होमपेज › Konkan › मोडकाआगर धरणाच्या पाणी पातळीत घट

मोडकाआगर धरणाच्या पाणी पातळीत घट

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:11PMसुरळ : वार्ताहर

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मोडकाआगर धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणार्‍या पाणी योजना संकटात सापडल्या आहेत. यामुळे हे धरण एकप्रकारे बिनकामाचे ठरत आहे.

या धरणाच्या पाण्यावरून पालशेत, असगोली, नागझरी, वरवेली, पाटपन्हाळे, आरे, गुहागर आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच धरणालगत या गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता विहिरी खोदल्या आहेत. तेथूनच या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असतो. परंतु, मोडकाआगर धरणाच्या पाणी पातळीच मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. 
हे धरण जनतेच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी बांधण्यात आले होते. सुमारे 47 वर्षांपूर्वी या धरणाची लघु पाटबंधारे खात्याकडून निर्मिती झाली. या धरणाची साठवण क्षमता 4.05 दशलक्ष घनमीटर इतकी असली तरी 1.780 घनमीटर पाणी या धरणातून वाहून जाते. या गोष्टीकडे संबंधित खाते लक्ष देत नसल्याने शासनाच्या या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

गुहागर तालुक्यातील पाण्याची समस्या दूर व्हावी आणि परिसरातील जमीन ओलिताखाली यावी याच  हेतूनेे हे धरण सुमारे 1960 च्या दशकात बांधले गेले. या धरणावर बांधण्यात आलेला पूल जीर्ण झाला आहे. 20 मीटर लांबीच्या या पुलाची केवळ मलमपट्टी करण्यात येते. यापूर्वी  गुहागर-विजापूर हा मार्ग याच धरणाच्या जुन्या मार्गाने जायचा. परंतु, धरण बांधल्यानंतर तो जुना रस्ता पाण्याखाली गेला.  संबंधित विभागाने मोडकाआगर धरणाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्‍त होत आहे.