Sun, Dec 15, 2019 03:39होमपेज › Konkan › नितेश राणेंचा राडा; अभियंत्‍याला घातली चिखलाची आंघोळ (video)

नितेश राणेंचा राडा; अभियंत्‍याला घातली चिखलाची आंघोळ (video)

Published On: Jul 04 2019 1:56PM | Last Updated: Jul 04 2019 2:46PM
कणकवली : प्रतिनिधी 

मुंबई - गोवा महामार्गावर चिखल, खड्डे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना सामोरे जावे लागले. आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले, एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते तो तुम्ही पण आज अनुभवावा, असे म्हणत नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. यावेळी त्यांना चिखलाने अंघोळ घातली आणि संतप्त कार्यकर्कर्त्यांनी शेडकर यांनी धक्काबुक्की केली. आणि चिखलाने अंघोळ घातलेल्या स्थितीत महामार्गावरील खड्डे दाखवत जाब विचारला.

या विषयी अधिक माहिती अशी की, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असताना कणकवलीत सर्व्हिस रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील गडनदीवरील रस्‍त्‍यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्‍य पसरले आहे. यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. त्‍यातच आज आमदार नितेश राणे यांनी स्‍वाभीमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह गडनदीच्या रस्‍त्‍यावर उपस्‍थिती लावली. तसेच यावेळी या रस्‍त्‍याच्या दुरावस्‍थेचा जाब विचारण्यासाठी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनाही बोलावले होते. यावेळी नितेश राणे यांनी या अभियंत्‍याला चांगलेच धारेवर धरले. संपूर्ण कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा जाब विचारला. तसेच रोज लोक हा चिखलाचा त्रास सहन करतात. तुम्‍हाला ही याचा त्रास सहन करायला लागला तर कसे वाटेल असे विचारले. 

राणेंच्या या उग्र अवताराणे हे अभियंते चांगलेच भांबावून गेले, त्‍यातच स्‍वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी चिखलाने भरून आणलेल्‍या बादल्‍या अभियंत्‍याच्या अंगावर रित्या केल्‍या. इतक्‍यावरच न थांबता राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांचे वस्तुस्थिती दाखवली आणि दोरखंडाने पुलाला बांधले.