Sun, Mar 24, 2019 23:02
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘मनसे’त आपलं बुवा जमायचं नाय

‘मनसे’त आपलं बुवा जमायचं नाय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

अर्धा डझन नेते, चार गट, छत्तीस कार्यकर्ते अशा परिस्थितीत चिपळुणातील ‘मनसे’ संघटनेची बैठक रविवारी सायंकाळी उशिराने पार पडली. या बैठकीला  संघटनेचे नेते माजी आ. बाळा नांदगावकर येणार होते. मात्र, अंतर्गत वादाच्या शिट्टीचा आवाज आल्याने नांदगावकरांनी अचानक मार्ग बदलला. या सर्व पार्श्‍वभूमीवर काहींनी तर ‘आपलं बुवा ‘मनसे’त जमायचं नाय, पर्याय शोधलेला बरा’, अशी भूमिका स्वीकारली आहे.

चिपळुणात रविवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास  ‘मनसे’च्या तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसे संदेशही ‘मनसे’त कार्यकर्त्यांमध्ये पोहचविण्यात आले. बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विश्‍वासू सहकारी माजी आ. बाळा नांदगावकर येणार होते. तसेच पक्षातील वरिष्ठ पातळीवरचे नेतेही सोबत होतेच. परंतु, प्रत्यक्षात मात्र, नांदगावकर यांनी मार्गदर्शनासाठी हजेरी लावलीच नाही. चिपळूण ‘मनसे’त अंतर्गत धुसफूस व कुरबुरी असल्याची कल्पना त्यांना कोकणातील मागच्या स्थानकावरच मिळाल्याने चिपळुणातील चार दिशांना चार तोंडे असलेल्या चार गटांच्या ‘मनसे’ला मार्गदर्शन कसे करावे, याची  उकल न झाल्यानेच त्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

दरम्यान, नांदगावकर यांच्या अनुपस्थितीत संघटनेतील नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय नाईक, मनोज चव्हाण, अनिल खानविलकर, रिटा गुप्ता व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर  आदींनी चार गटांतील छत्तीस कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याची जोखीम पत्करली. मार्गदर्शन करतानाच  संघटनेतंर्गत कुरबूर व धुसफूस असल्याची कल्पना नेत्यांना आली. परिणामी संघटन कौशल्य कसे असावे, संघटना का वाढत नाही. आजपर्यंत संघटना वाढीसाठी कोणी काय प्रयत्न केले, पक्षाचे उपक्रम राबवले का, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संख्या का घटली आदी अनेकविध प्रश्‍न, शंका-कुशंका उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विचारण्यात आल्या. तसेच यापुढे संघटना वाढवायची असेल तर गटबाजी संपवा, केलेल्या कामाचा अहवाल द्या, असेही स्पष्ट करण्यात 
आले.

दरम्यान, या संपूर्ण बैठकीबाबत शहरातील राजकीय आणि ‘मनसे’ वर्तुळात सुरू झालेल्या चर्चेतील मिळालेल्या माहितीनुसार बैठक होणार होती. त्याबाबतची कल्पना काहींनी माजी पदाधिकारी,  कार्यकर्ते यांना देण्याचे हेतूत: टाळले तर जे काही उशिराने पोहचले त्यांना वेळेअभावी बैठकीत प्रवेश मिळाला नाही. माहिती मिळताच जे वेळेवर हजर झाले. त्यांची मात्र कुचंबणा झाली. परंतु, तोंडावर बोट, हाताची घडी, अशी ‘मनसे’च्या शिकवणी वर्गातील विद्यार्थी अवस्था झाल्याने बैठकीनंतर नेत्यांची पाठ फिरल्यावर  ‘मनसे’च्या सुमारे अर्धा डझन नेत्यांच्या चिपळुणातील बैठकीत चार गटांचे छत्तीस कार्यकर्ते बैठकीतून बाहेर पडल्यावर अंतर्गत वादाची कोंडलेली वाफ उसळून बाहेर पडल्याने इंजिनाच्या अखेरच्या घरघरीची शिट्टी वाजवू लागली तर संघटना वाढीला या वादाने ‘मेगा ब्लॉक’चा सिग्नल मिळाला. काहींनी तर ‘आपलं बुवा मनसेत जमायचं नाय, नामधारी संघटना चालविण्यापेक्षा  पर्याय शोधलेला बरा’, असा पवित्रा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Tags : 


  •