Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Konkan › मिर्‍या-नागपूर महामार्गासाठी नव्याने अधिसूचनेचे आदेश

मिर्‍या-नागपूर महामार्गासाठी नव्याने अधिसूचनेचे आदेश

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मिर्‍या-कोल्हापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गात रत्नागिरी तालुक्यात हातखंबा ते शहर सीमेवरील साळवी स्टॉप येथील व्यापार्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे  भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, या सर्व प्रक्रियेतील अधिसूचनेची मुदत संपली आहे. त्यामुळे आता या राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गासाठी नव्याने अधिसूचना काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.  त्यानंतर यावरील हरकतींची सुनावणी घेण्यात येणार आहे.

मिर्‍या-कोल्हापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी वर्षभरापूर्वी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, रत्नागिरी तालुक्यात या महामार्गासाठीचे भूसंपादन होऊ शकले नव्हते. तालुक्यात मिरजोळे पाडावेवाडी, नाचणे, कुवारबांव ग्रामपंचायत परिसरातून रस्त्यालगतच्या व्यापार्‍यांनी  तसेच जमीनमालकांची रुंदीकरणावर हरकत घेतली होती. व्यापारी तसेच ग्रामस्थांच्या संघर्ष समितीने या संदर्भात अनेकदा आंदोलने करीत भूसंपादनाच्या प्रक्रियेत हरकत घेतली.  या भागात 60 मीटरचा होणारा या रस्त्याची काही भागात रुंदी 45 मीटर ठेवण्यात येणार आहे.  या चार गावांत ही रुंदी 30 मीटर ठेवावी, अशी मागणी आहे. अधिसूचना काढल्यानंतर एका वर्षात जागेची मोजणी, भूसंपादन आणि हरकतींवरील सुनावण्या होेणे गरजेचे होते. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास न गेल्याने ती मुदतही संपून गेली आहे. आता यासाठी नव्याने अधिसूचना काढावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत ही अधिसूचना काढण्यात येणार आहे.