Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Konkan › मंत्रिपद लांबल्यानेच राणेंना नैराश्य!

मंत्रिपद लांबल्यानेच राणेंना नैराश्य!

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:38PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

पालकमंत्री दिपक केसरकर, खा. विनायक राऊत व आपल्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेनेने विकासकामांना गती दिली आहे. जिल्ह्याचा नियोजन आराखडा 160कोटीपर्यंत पोचला असून नव्या वर्षात 180 कोटींचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून महामार्ग चौपदरीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. हायब्रीड अ‍ॅन्युईटी योजनेंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रूपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास थांबलेला नाही, राणेंचे आरोप हे मंत्रिपद लांबल्याच्या नैराश्यातून आहेत,असा टोला आ. वैभव नाईक यांनी लगावला. 

पालकमंत्री आणि शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्हा विकासात 10 वर्षे मागे नेला असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्याला आ. वैभव नाईक यांनी शनिवारी विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. आ. वैभव नाईक म्हणाले, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पर्यटनासाठी वेगळा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. कोकण ग्रामीण पर्यटन योजनेतून छोटी छोटी गावे विकसीत केली जाणार आहेत. ग्रामपंचायतींनाही निधी मिळण्यास सुरूवात झाली आहे. आंबा, काजू नुकसान भरपाई अंतर्गत 33 कोटीची भरपाई जिल्ह्याला मिळाली. तर जिल्ह्याला 25 कोटीची कर्जमाफी झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. प्रशासकीय परवानगी घेऊन येत्या जुन मध्ये चिपी विमानतळावरून विमान टेक ऑफ घेणार आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत निधी उपलब्ध केला जाणार आहे. गगनबावडा, तळेरे या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा  दर्जा देण्यात आला असून 4 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. सीआरझेड मध्येही बांधकामांना सवलत देण्यात आली आहे. गौणखनिजचा प्रश्‍नही सुटला असून स्थानिक कमिटीमुळे 100 खनिजपट्टे पूर्ण करण्यात आले आहेत. कुठलेही विकासाचे काम थांबलेले नाही. केवळ शासनाचा महसूल बुडविला जात असल्याने रेडी पोर्ट बंदर स्वतः शासनाने चालविण्यास घेतले आहे. जिल्ह्यातील बेनामी ठेकेदारी बंद  झाली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाही चांगल्याप्रकारे आहे. त्यामुळे राणे यांचे आरोप पूर्णपणे निराधार आणि पराभवाच्या भावनेतून आहेत. गेले वर्षभर बहुचर्चित असलेल्या राणेंना मंत्रीमंडळ प्रवेशासाठी शुभेच्छा. परंतू त्यांनी मंत्रीमंडळात सहभागी होताना स्वतःच्या पक्षाचे नाव मात्र बदलावे, असा टोला आ. नाईक यांनी लगावला.