Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Konkan › मंत्रिपदाची प्रतीक्षा लवकरच संपणार!

मंत्रिपदाची प्रतीक्षा लवकरच संपणार!

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:33PM

बुकमार्क करा
कुडाळ : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपच्या आघाडीत आहे, पण येणार्‍या निवडणूकामध्ये तिनही विधानसभा व  लोकसभेची मिळून चारही जागा स्वंतत्र लढणार  असल्याची माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी दिली. मंत्रीपदासाठी मी दिर्घ काळ वाट पाहणार नाही. मला थांबण्याची सवय नाही, असे सांगत आता मंत्रीपदासाठी दिर्घकाळ लागणार नाही लवकरच प्रतिक्षा संपेल असा आशावाद त्यांनी व्यक्‍त केला. पण सरकार व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपध्दतीवर निशाणा साधला.

कुडाळ येथील हॉटेल कोकोनट येथे शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते.  जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर आदी उपस्थित होते. 

नारायण राणे म्हणाले, मी आघाडीत असलो तरी  जिल्हा विकासाबाबत जे काही चुकीचे चालले आहे त्याबाबत मी बोलणारच. तसेच मुख्यमंत्र्यांनाही याबाबत स्पष्टपणे  सांगणार आहे. गेल्या तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाबाबत 10 वर्षे मागे गेला. सरकार व पालकमंत्र्यांनी निवडणूकीत केलेल्या घोषणांची अमंलबजावणी किंवा पूर्तता केली नाही. जिल्ह्यात विकास कामांसाठी निधी नाही. रस्ते, आरोग्य व्यवस्था यांची दुरावस्था झाली आहे. महसुल खात्यातील लोक जनतेचे शोषण करत आहेत. चिपी विमानतळ, सी वर्ल्ड प्रकल्प पालकमंत्री बंद करून गोव्याच्या विमानतळासाठी प्रयत्नात आहेत. दोडामार्गमधील एमआयडीसी व ओरोसमधील आयटी पार्कचे काम सुरू करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. जिल्हा परिषदच्या निधीत 40 टक्के कट लावल्याने विकास कामांना निधी मिळेनासा झाला आहे. 

हायवेचे काम संथ गतीने सुरू आहे. पालकमंत्री दहा महिने नियोजन बैठक घेवू शकत नाहीत. ग्रीन रिफानरी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. पडवे येथील हॉस्पिटलचे काम पूर्ण होत आले असून पंतप्रधान मोदींची उद्घाटनासाठी  वेळ मागितली आहे. आरोग्य सेवेबाबतही महाराष्ट्रने गोव्यावर अवलंबून न राहता आपल्या राज्यात सेवा निर्माण करायला हवी किंवा मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी गोवा राज्याला शुल्काची रक्‍कम द्यावी व जनतेला दिलासा द्यावा असे मत व्यक्‍त केले. आपण महिन्याभरात हॉस्पिटल सुरू करणार असल्याचे सांगितले. 

सावंतवाडी टर्मिनल काम बंद होण्यास पालकमंत्रीच जबाबदार असून त्याठिकाणी जागेचा प्रश्‍न निर्माण होईल म्हणून मडुरा येथे जागा निश्‍चित केली होती. मात्र त्याला त्यावेळी विरोध करण्यात आला. आतापर्यंत पालकमंत्र्यांनी एकही प्रकल्प जिल्हा विकासासाठी केला  नाही.