Thu, Apr 25, 2019 22:12होमपेज › Konkan › वालम प्रकरणात केसरकरांचा हात

वालम प्रकरणात केसरकरांचा हात

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 9:53PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलन प्रकरणात कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष मुंबईचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई ही राजकीय दबावापोटी करण्यात आली आहे. यामागे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा हात असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला.

एकीकडे शिवसेना आम्ही रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात असल्याचा कांगावा करीत आहे तर दुसरीकडेच त्यांचेच पदाधिकारी जमिनी विक्रीसाठी पुढे आहेत. याचा भांडाफोडही स्वाभिमान संघटनेने केला आहे. तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे पोलिसांच्या दंडुकेशाहीचा वापर करीत शांततेत चाललेले आंदोलन चिघळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ते आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून आंदोलन चिरडून टाकून आपली पोळी भाजून घेत आहेत. मात्र, हे स्वाभिमान संघटना खपवून घेणार नाही, असा इशाराही नागरेकर यांनी यावेळी दिला. या प्रकल्पाला स्वाभिमान संघटनेचा विरोध असल्याचा त्यांनी पुनरूच्चार करताना आंदोलकांवर जर पोलिस कारवाई करणार असतील तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोणत्याही थराला जाऊन त्या विरोधात आवाज उठवेल, अशा इशारा दिला आहे.

यावेळी नूतन तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले, स्वाभिमान पक्षाचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून तो कायम राहील. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी लढा उभारणार आहोत. यावेळी नंदकुमार राऊत, लक्ष्मण शिरवडकर, मारूती करंगुटकर, नंदकुमार कवीस्कर आशिष मालवणकर, प्रशांत शेलार, धोंडू सोडये आदी  उपस्थित होते.