Sat, Dec 07, 2019 14:59होमपेज › Konkan › जेलच्या हवेमुळे भुजबळांचा तोल ढासळला : ना. गीते

जेलच्या हवेमुळे भुजबळांचा तोल ढासळला : ना. गीते

Published On: Jan 12 2019 11:53PM | Last Updated: Jan 12 2019 11:00PM
चिपळूण : प्रमोद पेडणेकर

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलची हवा खाऊन सध्या जामिनावर असलेल्या छगन भुजबळ यांनी राजकारणातील नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. त्यांचा तोल ढासळला आहे. राजकीय नेता म्हणून त्यांनी लोकांचा विश्‍वास गमावला आहे. त्यामुळे  त्यांनी कितीही वल्गना केली, तरी तटकरे यांचा पराभव ते रोखू शकणार नाहीत, असा हल्ला केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी छगन भुजबळ यांच्यावर चढविला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने गुहागर व खेड येथील जाहीर सभेत भुजबळ यांनी शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर जोरदार टीकाटिपणी केली होती. 

शनिवारी ना. गीते  यांनी  या टीकेवर पलटवार करीत भुजबळ  यांच्या  विकासाच्या गाथा महाराष्ट्रापासून दिल्लीतील महाराष्ट्र सदनापर्यंत सर्वत्र चर्चिल्या जातात. एक सामान्य भाजी विक्रेते असलेले भुजबळ सध्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांसंदर्भात अडीच वर्षे जेलमध्ये होते. सध्या ते जामिनावर सुटले आहेत. भुजबळ यांची राजकारणातील पत संपलेली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर टीका करीत आहेत. 

वास्तविक भुजबळ आता राजकारणात अदखलपात्र नेते आहेत. त्यांच्या टीकेची दखल घेण्याची गरज नाही.  मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना नाशिकमधून पराभूत केले आहे, अशी टिप्पणी गीते यांनी बोलताना केली. 

 बेहिशेबी मालमता, भ्रष्टाचाराचे आरोप व जनतेचा विश्‍वास गमाविलेल्यांनी माझ्यावर केलेली टीका निरर्थक आहे. मी  त्याची दखल घेणे तसेच त्याला उत्तर देणे मला संयुक्तिक वाटत नाही. मी जनतेच्या विवेकावर विश्‍वास ठेवतो, असेही ना. गीते यांनी ठामपणे सांगितले.