Wed, May 22, 2019 10:29होमपेज › Konkan › मंदिराचा खांब कोसळला ; घरांच्या भिंतीनाही तडे; सुरुंग सुरुच असल्याचा आरोप

खाण खोदाईने बोरजवर सुलतानी संकट

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 9:01PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील बोरज गावातील ब्रिटीशकालीन पालिकेचे धरण, शेवरवाडी व आग्रेवाडीच्या मधोमध गेल्या काही महिन्यांपासून बेलगामपणे सुरू असलेल्या दगडाच्या खाणीतील उत्खनन आता गावावर सुलतानी संकट म्हणून घोंघावू लागले आहे. बोरज धरणानजीकच असलेल्या एका खासगी शिव मंदिराचा सुरूंग स्फोटाने खांब कोसळला असून, मंदिराला तडे गेले आहेत. गावातील शेवरवाडी व आग्रेवाडीतील सुमारे पंचवीस ते तीस घरांना देखील तडे गेले आहेत.

बोरज गावातील खेड नगर पालिकेच्या मालकीचे ब्रिटीशकालीन धरण आहे. या धरणाच्या जलाशय साठ्यापासून पाचशेमीटरच्या आतच एक मोठी खडकाची खाण सुरू असून या खाणीच्या एका बाजूला बोरज गावातील शेवरवाडी तर दुसर्‍या बाजूला आग्रेवाडी आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारी कंपनी बोरज गावातील मनिषा मनोहर घोसाळकर यांच्या मालीकच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात खडकांची उचल करीत आहे. बोरज ग्रामपंचायतीने या खाणीतून ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवू नये या अटीवर ना-हरकत दाखला दिला होता. परंतु काही महिन्यांपूर्वी खाणीत खुले सुरूंग स्फोट करण्यात आले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्याचा त्रास होऊ लागला. अखेर बोरज ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या खाणीला दिलेला ना-हरकत दाखला रद्द करत खाणीत सुरूंग स्फोटाद्वारे खोदाई थांबवण्यास सांगितले. 

बोरज ग्रामसभेने खाणीबाबत कठोर भूमिका घेत त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व सातत्याने येत असलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारींबाबत खेडचे उपविभागीय अधिकारी यांना देखील कळवले. गावात झालेल्या बैठकीत सुरुवातीला ज्या घरांना सुरूंग स्फोटाने तडे गेले त्या ग्रामस्थांनी भले नुकसान भरपाई कमी द्या पण सुरूंग स्फोट थांबवा अशी भूमिका घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी खाणीतील सुरूंग स्फोट संबंधितांकडून थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सुरूंग स्फोटांना सुरुवात झाली आहे.  काही दिवसांपूर्वीच खाणीपासून सुमारे तीनशे ते चारशे मीटर अंतरावर असलेल्या बोरज येथील ब्रिटीशकालीन धरणाच्या परिसरातील सीताराम विठू जाधव यांच्या मालकीच्या शिवमंदिराचा एक खांब कोसळला. मंदिराच्या इतर खांबांसह संपूर्ण इमारतीला तडे गेले आहेत. या प्रकाराला लगतच असलेल्या खाणीत करण्यात येत असलेले सुरूंग स्फोट जबाबदार आहेत, असा आरोप जागा मालक श्री.जाधव यांनी केला आहे. 

बोरज गावातील शेवरवाडीतील घरांची पाहणी केली असता सुरेश शंकर गुहागरकर, भरत वसंत गुहागरकर, अशोक शंकर गुहागरकर, कृष्णा दौलत अदावडे आदींच्या घराला देखील तडे गेले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गावातील आग्रेवाडी येथील ग्रामस्थांच्या घरांची पाहणी केली असता तेथील अनंत शिवराम पांचांगळे, मनोहर लक्ष्मण मोरे, संतोष सिताराम आग्रे, नविंद्र बंडू आग्रे, बाळू सखाराम सनगरे, रमेश महादेव आग्रे आदींच्या घरांना देखील भेगा पडल्या आहेत. 

तलाठी श्री. ठसाळे यांच्या ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी काही घरांची पाहणी करून पंचनामेही केले आहेत, मात्र अद्याप सुरूंगस्फोट सुरूच आहेत, अशी माहिती निगडे-बोरज ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र मोरे यांनी दिली. दररोज सायंकाळी 6 नंतर गावातील खाणीमध्ये आता बोअर ब्लास्टींग पद्धतीने स्फोट घडवले जात आहेत.