Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Konkan › साश्रूनयनांनी शहीद प्रथमेश कदम यांच्यावर अंत्यसंस्कार ! (video)

साश्रूनयनांनी शहीद प्रथमेश कदम यांच्यावर अंत्यसंस्कार ! (video)

Published On: May 17 2018 2:08PM | Last Updated: May 17 2018 2:18PMमहाड : प्रतिनिधी  

भारतीय सैन्यदलात भोपाळ येथे सेवा बजावत असताना रेल्वे अपघातात झालेल्या स्फोटामध्ये शहीद झालेल्या महाड तालुक्यातील शेवते गावच्या मूळ निवासी असलेल्या प्रथमेश दिलीप कदम यांच्या पार्थिवावर आज हजारो नागरिकांच्या साक्षीने  शासकीय अधिकारी लष्करी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शहीद प्रथमेश कदम अमर रहे, भारत माता की, जयच्या घोषणांनी या वीरपुत्रास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी श्रद्धांजली अर्पित करताना महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी शहीद प्रथमेश कदमचे  बलिदान व्यर्थ जाणार नाही असे उद्गार काढले, तर माजी आमदार माणिकराव जगताप यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्रास भारतीय सैन्यदलात दाखल करण्याचे धैर्य दाखवणाऱ्या कदम कुटुंबियांचा गौरव केला.

भोपाळ येथे १२ मे शनिवारी दुपारी झालेल्या रेल्वे अपघातादरम्यान झालेल्या बचाव मोहिमेतील कामामध्ये स्फोटात प्रथमेशला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्यावर दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये तीन दिवस उपचार सुरू होते मात्र मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. आज शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शहीद प्रथमेश कदम यांचे पार्थिव सैन्यदलाच्या विशेष अॅम्ब्युलन्समधून शेवते या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी महाड आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, सुभाष निकम, जयवंत दळवी, सुरेश कालगुडे, सुरेश महाडिक, याचबरोबर भोपाळ येथील ईएमई युनिटचे वरिष्ठ अधिकारी व प्रथमेश चे  सहकारी  यांचा समावेश होता.

सैनिकी परंपरा असलेल्या शेवते गावातील चार पिढय़ांचा वारसदार म्हणून गेल्या आठ वर्षांपूर्वी भारतीय सेनादलात दाखल झालेल्या प्रथमेश दिलीप कदम यांनी भोपाळ येथील ईएमई युनिटमध्ये सध्या सेवा बजावित होता १२ मे रोजी रेल्वे अपघाताचे दरम्यान बचाव मोहीम सुरू असताना स्फोटात तो गंभीर जखमी झाला होता.

प्रथमेशच्या बुधवारी झालेल्या निधनाच्या वृत्तानंतर शेवते गावासह संपूर्ण महाड तालुक्यात शोककळा पसरली होती. दुपारी महाडचे नायब तहसीलदार कुडाळ यांनी स्थानिक प्रशासनाच्या वतीने कदम कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आज सकाळी प्रथमेश पार्थिव शेवते गावामध्ये आल्यानंतर त्याच्या घरा समोरील अंगणात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाडचे तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांचे दर्शन घेतले.

शेवते गावातील वैकुंठ भूमीमध्ये शहीद प्रथमेश कदम यांच्या पार्थिवावर भारतीय सैन्यदला तर्फे ई एम ई युनिट च्यावतीने सुभेदार मेजर आर आरबी तांबे, हवालदार एस ए काशीद, शिपाई श्री खांडेकर शिपाई भालेकर, हवालदार अंमोल जाधव, यांसह मुंबई युनिट से मेजर नरेश कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यानंतर स्थानिक पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली. 

शासनाच्यावतीने महाडचे तहसिलदार चंद्रसेन पवार महाड एमआयडीसी तर्फे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालया तर्फे डी. एच. पेवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी महाडकर जनतेच्यावतीने श्रद्धांजली अर्पित  करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील सैनिकी परंपरा असणाऱ्या गावांचा उल्लेख करून या गावातील एका सैनिकी परंपरेचा चार पिढ्यांपासून सैन्यदलात असलेल्या कदम कुटुंबांमधील प्रथमेशचे सैन्यदलातील कामगिरी चा गौरव केला त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू असताना त्याचे हे दुःखद निधन कुटुंबासाठी वेदनादायी असले तरीही त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही याकरिता सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील तसेच परिवारातील  जास्त संख्येने सैन्यदलात जाऊनशहीद प्रथमेशला आगळी श्रद्धांजली अर्पित करावी असे आवाहन केले.

माजी आमदार माणिकराव जगताप यांनी यावेळी बोलताना आईवडिलांचा एकुलता एक असणाऱ्या मुलाला भारतीय सैन्य दलात पाठवण्याचे कदम कुटुंबियांचे धैर्य कौतुकास्पद असल्याचे सांगून अत्यंत कठीण परिस्थितीतून मुलाला शिक्षण देऊन त्यांनी  प्रथमेशला सैन्यदलात भरती केल्याची माहिती दिली. सैनिकी परंपरा असलेल्या आपल्या कुटुंबियांचा पुत्र देशसेवेसाठी या कारणाने  अर्पण करत असतानाच काळाने अचानक झडप घालून त्याला आपल्यातून हिरावून नेल्याची भावना व्यक्त केली. महाडसह रायगडच्या भूमीला असणाऱ्या सैनिकी परंपरेला साजेसे कार्य शहीद प्रथमेश यांनी केले असून प्रथमेशच्या  निधनाचे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो अशी अपेक्षा श्री जगताप यानी व्यक्त केली . यावेळी सुभाष निकम जयवत दळवी यांनीही आपली श्रद्धांजली अर्पण केली. महाड तालुक्यातील हजारो  नागरिकांनी साश्रू नयनाने शहीद प्रथमेशच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आपली श्रद्धांजली अर्पण केली.