होमपेज › Konkan › ५५ पर्यटन बोटींची ‘मेरीटाईम’कडून अचानक तपासणी

५५ पर्यटन बोटींची ‘मेरीटाईम’कडून अचानक तपासणी

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:59PM

बुकमार्क करा
मालवण: प्रतिनिधी

डहाण समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटक कॉलेज विद्यार्थ्यांची बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याने विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते शिरोडा-वेळागर किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायात कार्यरत असणार्‍या 55 बोटींची रविवारी मेरिटाईम बोर्डाकडून अचानक तपासणी करण्यात आली. मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात आली. 

डहाणू येथील दुर्घटनेमुळे पर्यटन बोटींच्या क्षमतेवर व सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात सहभागी असलेल्या बोटींची तपासणी करण्याचे आदेश सर्व निरीक्षकांना दिले होते. या मोहिमेत सर्व बोटींमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारी लाईफ जॅकेट तसेच इतर साधने उपलब्ध असल्याचे दिसून आले.

बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, प्रभारी निरीक्षक अनंत गोसावी, निरीक्षक रजनीकांत पाटील, निरीक्षक अमोल ताम्हणकर, सहायक बंदर निरीक्षक विश्राम घाडी, तुळाजी मास्के, वामनराव आळवे यांनी संपूर्ण जिल्ह्यात ही तपासणी मोहीम राबविली. यात 55 बोटींची तपासणी करण्यात आली. तसेच अन्य काही बोटींची तपासणी करण्यात आली. काहींची कागदपत्रे अपूर्ण आढळून आल्याने त्यांना पंधरा दिवसांत कागदपत्रे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सर्व बोट व्यावसायिकांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत जागृत करण्यात येणार आहे, अशी माहिती बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली. पर्यटन व्यवसायासाठी वापरण्यात येणार्‍या बोटींसाठी परवानगी घेणे आवश्यक असून, याबाबत काही समस्या असतील तर त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी बंदर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले 
आहे.