Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Konkan › चिघळणार्‍या मराठा आंदोलनास सरकार जबाबदार!

चिघळणार्‍या मराठा आंदोलनास सरकार जबाबदार!

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 10:32PMकणकवली : वार्ताहर

मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची  तीव्रता वाढू लागली आहे. मराठा समाजाने दोन वर्षे संयम पाळला. सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे योग्यवेळी सादर केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे महाराष्ट्रात चिघळणार्‍या मराठा आंदोलनास सरकारच जबाबदार असणार आहे, असे मत माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्‍त केले.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाविषयी खा. राणे यांना विचारले असता त्यांनी ही परिस्थिती निर्माण होण्यास सरकारच जबाबदार आहे असे सांगितले. सरकारकडून मराठा समाजाला गृहीत धरले जात आहे. मराठा क्रांती मोर्चा नंतर सरकारने वेळीच पावले उचलत आरक्षणासंदर्भात आपली भूमिका न्यायालयासमोर मांडणे आवश्यक होते. सरकारने वेळीच प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. आरक्षणा देण्याबाबतची आपली भुमिका सरकारने स्पष्ट करायला हवी. मराठा समाज संयम बाळगून असला तरी हे आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करण्यापूर्वी सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आंदोलनाची दिशा, स्वरूप बदलत असू मराठा समाजाचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घ्यायला हवा, असे खा. राणे यांनी सांगितले.