होमपेज › Konkan › आरक्षणप्रश्‍नी सिंधुदुर्गातील मराठा बांधवही आक्रमक

आरक्षणप्रश्‍नी सिंधुदुर्गातील मराठा बांधवही आक्रमक

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 11:13PMकुडाळ ः प्रतिनिधी 

लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही मराठा समाजाला शासनकर्ते  झुलवत ठेवत आहेत. यामुळे राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक बनले असून राज्यात ठिकठिकाणी मराठा बांधवांचे आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांनीही गनिमी काव्याने मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री पावशी येथे व सोमवारी सकाळी बिबवणे विद्यालयासमोर टायर जाळून आपला शासन विरोधी संताप व्यक्‍त केला. या गनिमी आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही ठिकाणी जवळपास एक-एक तास खोळंबल्याने वाहनचालक व प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला.  

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर शांततेत मोर्चा निघाले. या मोर्चाची ग्रिनिजबुकने सुध्दा दखल घेतली. तत्कालीन आघाडी शासनकत्यार्ं नी आश्‍वासने दिली. आता आघाडी शासन जावून भाजपा-युतीचे शासन आले. पण या शासनाकडूनही आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे राज्यभर मराठा बांधवानी संताप व्यक्‍त केला आहे. या संतापाचा भडका सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दिसून येत आहे. या संतापाच्या भरात रविवारी रात्री 10.30 वा.च्या सुमारास पावशी येथे महामार्गावर पेटते टायर टाकून महामार्ग रोखण्यात आला तर सोमवारी सकाळी 9 वा.च्या सुमारास बिबवणे विद्यालयासमोर पेटते टायर फेकून एक तास महामार्ग रोखून धरण्यात आला. आंदोलन स्थळी मराठा क्रांती मोर्चाचे झेंडे फडकविण्यात आले. दरम्यान नेहमीप्रमाणे घटनास्थळी उशीरा दाखल झालेल्या पोलिसांच्या हाती आंदोलक लागले नाही.  पोलिसांनी पेटते टायर बाजुला करुन महामार्ग मोकळा केला. त्या नंतर उशिरापर्यंत हे आंदोलनकर्ते कोण?याचा माग पोलिस काढत होते.