Wed, Aug 21, 2019 15:15होमपेज › Konkan › मान्सून कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भापर्यंत

मान्सून कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भापर्यंत

Published On: Jun 09 2018 11:35PM | Last Updated: Jun 09 2018 11:33PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने शनिवारी मान्सून महाराष्ट्रातील कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भापर्यंत दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील 12 जूनपर्यंत कोकण आणि विदर्भात मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असल्याची शक्यता व्यक्‍त करण्यात आली आहे. 

भारतीय हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ दिनेश मिश्रा यांनी मान्सूनच्या आगमनानंतर पर्जन्यवृष्टीबाबत समाधानकारक अंदाज व्यक्त केले आहेत. कोकणातील ठाणे, पश्‍चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील यवतमाळपर्यंत मान्सून पोहोचल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. सुरूवातीला न्रैऋत्य मोसमी पाऊस उत्तर पश्‍चिमेकडे वेगाने सरकत होता. जेव्हा तो केरळात आला त्याचवेळी तो इशान्य भारतातही पोहोचला होता. मात्र गेल्या चार पाच दिवसात मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने सुरू झाला आणि तो थेट महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. त्याचवेळी इशान्य भारतातील मान्सून आसाम, बिहार, झारखंड या  राज्यांकडे सरकणे आवश्यक होते. परंतु तो अरूणाचलप्रदेश आणि पश्‍चिम बंगालपर्यंत थांबला आहे. पुढील पाच-सहा दिवसात मान्सून गुजरात राज्य व्यापून टाकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास जुलै महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.
मान्सूनचे जेव्हा केरळ आणि कर्नाटकात आगमन झाले त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आजच्या घडीला बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा तीव्र स्वरूपाचा आहे. परिणामी सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतही पाऊस आहे. हा कमी दाबाचा पट्टा किमान 12 जून पर्यंत राहणार आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भ या ठिकाणी तुफानी पर्जन्यवृष्टी तर पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी त्यापेक्षा काहीशी कमी परंतु पुरेशी पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज दिनेश मिश्रा यांनी व्यक्‍त केला आहे.

सिंधुदुर्गातील खरा मान्सून शनिवारपासूनच

सिंधुदुर्गातील खरा मान्सून हा शनिवार सकाळपासुनच सुरू झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी कोकणात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु शुक्रवारी तितकासा पाऊस नव्हता. शनिवारी सकाळपासून मात्र पावसाला सुरूवात झाली. अगदी दिवसभर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी होते. खर्‍या अर्थाने पावसाळी वातावरण सुरू झाले आहे.