होमपेज › Konkan › थंडी गायब झाल्याने आंबा धोक्यात

थंडी गायब झाल्याने आंबा धोक्यात

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 10:46PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

मकर संक्रमणानंतर जिल्ह्यात तापमानवाढीने बदलत्या वातावरणाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता आहे. नव्याने आलेल्या फुलोर्‍यालाही  वातावरण मारक ठरण्याची भीती आंबा बागायतदारांतून वर्तविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजनासांठी आंबा पीक संरक्षण पथकाला आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेेत. 

फळधारणा झालेल्या फांदीला पुन्हा मोहर येऊ लागल्याने फळ गळती वाढत आहे. थंडीमुळे जुन्या पालवीला मोहर येत आहे. मात्र, नवीन पालवी अजून फुटलेली नाही. बहुतांश बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळ गळती सुरू झाल्याने फेब्रुवारीच्या अखेरीस पहिल्या टप्प्यात  येणार्‍या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. 

डिसेंबरच्या मध्यापासून थंडीचा जोर रत्नागिरी जिल्ह्यात वाढला होता. मात्र, जानेवारीतच थंडी गायब झाली आहे. थंड वातावरणामुळे पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराला फळधारणा झाली होती. काही बागांमध्ये मोठ्या कैर्‍या लगडलेल्या आहेत. जास्त काळ थंडी कायम राहिल्याने कैर्‍या लागलेल्या फांदीच्या जुन्या पालवीवर पुन्हा मोहर धरू लागला आहे.