Thu, Nov 15, 2018 06:10होमपेज › Konkan › आंबा कैरीला गळती; मोसम लांबणीवर!

आंबा कैरीला गळती; मोसम लांबणीवर!

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:25PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीत कच्चा आंबा (कैरी) विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत थंडीच्या तीव्रतेत झालेले बदल, ओखी वादळाच्या वेळी बदललेले वातावरण, त्यातून झालेल्या अवकाळी पावसामुळे कलमांवरची फळे मोठ्या प्रमाणात गळू लागली. याच कैर्‍या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे पिक्या आंब्याचा मोसम लांबणीवर पडणार असल्याने आंबा बागायतदार संभाव्य नुकसानीमुळे चिंतातूर झाला आहे.

दरवर्षी मार्च महिन्यात हापूस आंबा मोसम मार्च महिन्याच्या अखेरीपासून सुरू होतो. यावर्षी याच महिन्यात फूल तयार होणारा आंबा गळून गेला आहे. गेल्या 25 वर्षांच्या आंबा व्यवसाय अनुभवात इतक्या मोठ्या प्रमाणात फळ गळती झाली नव्हती, असे आंबा बागायतदार प्रदीप साळवी यांनी सांगितले. ज्या कलमांवर 10-12 पेट्यांचा आंबा धरला होता त्या झाडांवर एखादं-दुसरे फळ दिसत असल्याचेही साळवी यांनी सांगितले.

पहिले फळ गळल्याने दुसर्‍या मोहराचा आंबा जून महिन्यात तयार होईल. त्यावेळी आंब्याला दर मिळत नाही. अशावेळी पहिल्यावेळी फवारणीसह इतर लाखो रुपयांचा प्रत्येक बागायतदाराचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार अडचणीत आले आहेत. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर वातावरणात झालेले बदल, त्यातून झालेला अवकाळी पाऊस व मध्येच वाढणारी थंडी आदी कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.