Mon, Jun 24, 2019 17:04होमपेज › Konkan › रत्नागिरीत 17 पासून आंबा महोत्सव

रत्नागिरीत 17 पासून आंबा महोत्सव

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 14 2018 11:57PMरत्नागिरीः प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत दि.17 एप्रिल ते 27 मे या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या कालावधीत  हातखंबा, गणपतीपुळे, लांजा, सावर्डे, खेड, दापोली तसेच मंडणगड येथे 141 स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. 

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीसह महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी विभाग, ‘आत्मा’, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या महोत्सवाचे दि.17 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता हातखंबा येथे  जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आ. उदय सामंत, आ. राजन साळवी, आ. भास्कर जाधव, आ.सदानंद चव्हाण, आ.  संजय कदम, आ. हुस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आदी उपस्थित राहणार आहेत.

आंबा महोत्सवाअंतर्गत हातखंबा तिठा येथे 24 स्टॉल्स, गणपतीपुळे येथे 52, लांजा येथे 15, सावर्डा येथे 10 स्टॉल्स, खेड येथे 20 स्टॉल्स, दापोली येथे 10 तर मंडणगड येथे 10 स्टॉल्स  उभारण्यात येणार आहे.  या महोत्सवात जास्तीत -जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती मधुकर दळवी, शौकत माखजनकर यांनी केले आहे.  महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी सुहास साळवी, सुधाकर कोकिरकर, अतुल नागवेकर यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.