Fri, Jul 19, 2019 01:44होमपेज › Konkan › मंडणगड नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे बिनविरोध

मंडणगड नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे बिनविरोध

Published On: May 24 2018 10:30PM | Last Updated: May 24 2018 9:53PMमंडणगड : प्रतिनिधी

मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या रंगतदार लढतीमध्ये राहुल कोकाटे यांची दुसर्‍यांदा वर्णी लागली आहे. 
दापोली प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. महाआघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी एकमेव नेत्रा शेरे यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी महाआघाडीच्या वतीने स्नेहल मांढरे, शहर विकास आघाडीचे विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे यांनी अर्ज दाखल केला होता. आठ महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून फारकत घेऊन चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या नावाने गट तयार केला होता आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उपनगराध्यक्ष बसविला होता. यावेळी राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळेल अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीच्या वेळी वेगळे चित्र निर्माण झाले. मात्र, यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या कोकाटे यांना मतदान केले. काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारास सहा मते मिळाली. नगरसेवक राजेश मर्चंडे हे निवडणुकीला गैरहजर राहिले. यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक दहा विरुद्ध सहा अशी होऊन पुन्हा एकदा या पदावर राहूल कोकाटे विजयी झाले.