Fri, Mar 22, 2019 01:47
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › देवरुखातही वाढतेय मनसेचे ‘राज’

देवरुखातही वाढतेय मनसेचे ‘राज’

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:27PMदेवरूख : प्रतिनिधी

देवरूख नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी आपली ताकद आजमावली. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील निवडणूक रिंगणात सर्व ताकदीनिशी उतरली होती. खेड पाठोपाठ देवरूखमध्ये नगरसेवक निवडून आणण्यामध्ये ‘मनसे’ला यश मिळाले आहे.

देवरूखात ‘मनसे’ने केवळ चारच जागांवर लक्ष केंद्रित केले होते. निवडणुकीपूर्वी देवरूख शहरात ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी केलेली कामे त्यांना निवडणूकप्रसंगी फायद्याची ठरल्याची दिसत आहेत. निवडणूक प्रचारामध्ये ‘मनसे’ची व्युव्हरचना यशस्वी ठरवण्यासाठी राज्यस्तरावरच्या नेतेमंडळींनी चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. निवडणुकीपूर्वीपासून मनसेचे राज्य सरचिटणीस व कामगारसेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण त्यांचे सहकारी व संगमेश्‍वरचे संपर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे यांच्याबरोबरच जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळत प्रस्थापितांना चांगलीच लढत दिल्याचे पहायला मिळाले.

चार जागांमध्ये प्रभाग क्र. 12 मध्ये सान्वी संसारे यांनी 229 मते घेत काँग्रेस व सेनेचा दारूण पराभव करत विजय पटकावला आहे. प्रभाग 11 मध्ये झालेल्या लढतीत आस्था अनुराग कोचिरकर यांनीदेखील राष्ट्रवादी व शिवसेना या दोघांसमोर निकराची लढाई करत चांगली मते मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा झालेला पराभव हा निसटता पराभव झाल्याचे स्पष्ट होत आहे. याबरोबरच प्रभाग 10 मध्येदेखील झालेल्या पंचरंगी लढतीत गिरीष भोंदे यांनी देखील 129 मते घेत मातब्बरांना चांगली फाईट दिली. देवरूखमध्ये ‘मनसे’ने आपलीदेखील चांगली ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. दोन प्रभागात काही मतांसाठी निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र, ‘मनसे’ने भाजपला साथ देत आपली ताकद दाखवून दिली आहे. ‘मनसे’ने मिळवलेले यश हे दखल घेण्याजोगे आहे.