होमपेज › Konkan › नदी जोडण्यापेक्षा माणूस नदीला जोडावा : डॉ. राजेंद्र सिंह

नदी जोडण्यापेक्षा माणूस नदीला जोडावा : डॉ. राजेंद्र सिंह

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:58PMकासार्डे : वार्ताहर 

नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे. तरच पाण्याचा प्रश्‍न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे आणि गरजेनुसार वापरलेही पाहिजे. कोकणात मुबलक पाणी असूनही पाण्याची टंचाई का भासते? पाण्याबद्दल सिंधुदुर्गातील लोकांना गांभीर्य नाही. त्यासाठी जलसाक्षरता अभियान राबविले जावे. अन्यथा 21 व्या शतकात ‘ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज’ चे सर्वात मोठे आव्हान समोर असेल, असे प्रतिपादन जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध ‘रॅमन मॅगसेसे व स्टॉकहॉल्म वॉटर’ पुरस्कार विजेते ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ डॉ. राजेंद्र सिंह यांनी तळेरे येथे केले.  

मुंबई विद्यापीठ संचालित सिंधु स्वाध्याय संस्था व तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्‍वनाथ दळवी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आयोजित केलेल्या ‘भूगर्भ जलसंवर्धन व समृद्धी’ या विषयावर विशेष चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.मुंबई विद्यापीठाचे  कुलगुरू  सुहास पेडणेकर, सिंधु स्वाध्याय संस्थेचे शैक्षणिक समन्वयक विनायक दळवी,कॅ. निलीमा प्रभू,पं.स.उपसभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे यांच्यासह अन्य  उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, राजस्थानमध्ये आढळणार्‍या पाच प्रकारच्या वनस्पती सिंधुदुर्गात आढळतात.या वनस्पती ज्याठिकाणी पाणी नसते अशा ठिकाणी आढळतात, असे सांगत याबद्दल लोकांना चिंता का वाटत नाही, याबाबत नाराजी व्यक्‍त केली. 

कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, एका बाजूला समुद्र, बाहेर पाऊस त्यामुळे पाणीच पाणी, तरीदेखील पाणी मिळत नाही, हा विरोधाभास का? निसर्गाने मोठ्या प्रमाणात देणगी दिलेल्या या प्रदेशाची किती जणांना जाणीव आहे? कारण लोक नोकरीसाठी येथेे येतील अशी वेळ आली पाहिजे. एवढी समृध्दता याठिकाणी पाहायला मिळते, असे सांगत निसर्गाशी आपल्याला जुळवून घ्यायला हवे, तरच निसर्गाचा समतोल राहील. यासाठी एकत्र येऊन चांगले आणि उच्च शिक्षण कसे देता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी मुंबई विद्यापीठ नेहमीच सहकार्य करेल.अशी ग्वाही दिली.डॉ. राजेंद्र सिंह यांनी सकाळी तळेरे परिसरातील अनेक ठिकाणी जाऊन पाण्याचे स्त्रोत, इथल्या मातीचे परीक्षण केले.