Wed, Feb 19, 2020 08:59होमपेज › Konkan › अंगावर दगड कोसळून कामगार ठार

अंगावर दगड कोसळून कामगार ठार

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 10:52PM

बुकमार्क करा

मालवण  : प्रतिनिधी

काळ्या दगडाच्या खाणीत काम करीत असताना डोंगरावरील भला मोठा दगड अंगावर कोसळला. या दुर्घटनेत इराण्णा अमरप्पा चव्हाण हा 50 वर्षीय कामगार ठार झाला. सोमवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास हेदूळच्या डोंगरमाथ्यावर दुर्घटना घडली.

इराण्णा चव्हाण हा आपल्या दोन सहकार्‍यांसह माती बाजूला करण्यासाठी या खाणीवर गेला होता. यावेळी त्यांच्यासमवेत डंपर चालक नामदेव परब हे होते. काही मजूर डंपरमध्ये माती भरत होते. माती भरण्याचे काम सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात उंच डोंगरावरील एक भलामोठा खडक अचानक घरंगळत खाली आला. हा खडक थेट   इराण्णा चव्हाण यांच्या अंगावर कोसळला. दगडाच्या या प्रहाराने इराण्णा हा जमिनीवर कोसळला. तो जागीच ठार झाला. कामगारांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, ती धावपळ निष्फळ ठरली. याबाबत नामदेव परब याने कट्टा पोलिस दूरक्षेत्राला मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे हे. कॉ. उत्तम आंबेरकर, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्निल तांबे, योगेश सराफदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत दशरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. इराण्णा चव्हाण याच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी कर्नाटकहून इराण्णा याचे नातेवाईक आल्यानंतर त्यांच्याकडे मृतदेह ताब्यात देण्यात आला.