Tue, Jul 23, 2019 06:27होमपेज › Konkan › विक्रांत सावंत यांना काँग्रेस प्रवेशासाठी विनवणी!

विक्रांत सावंत यांना काँग्रेस प्रवेशासाठी विनवणी!

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:20PM

बुकमार्क करा
मालवण :प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची सक्षम फळी उभारण्याचे काम जोमात सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारांशी जुळलेल्या व सध्या अन्य पक्षात असलेल्या अनेकांना काँग्रेस पक्षात येण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच धर्तीवर शिवसेना सावंतवाडी विधानसभाप्रमुख म्हणून कार्यरत असलेला माझा मुलगा विक्रांत यालाही काँग्रेस पक्षात येण्याची विनवणी सुरू असल्याची कबुली काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी मालवण येथे दिली.

मालवण येथे आलेल्या विकास सावंत यांनी मोरेश्‍वर संकुल येथे पत्रकार परिषदेत तालुक्याची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर केली. यात तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, उपाध्यक्ष देवानंद चिंदरकर, मनोज लुडबे, सरचिटणीस अरविंद मोंडकर, चिटणीस विष्णू देऊलकर, खजिनदार महेश राणे, सहखजिनदार विकास चव्हाण, सदस्य सागर चव्हाण, प्रसाद आडवणकर, महेंद्र मांजरेकर, जगदीश शिरोडकर, मेघ:श्याम लुडबे, हेमंत माळकर ही कार्यकारिणी निवडण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. यावेळी देवानंद चिंदरकर वगळता सर्व कार्यकारिणी उपस्थित होते.

कणकवली पाठोपाठ मालवण तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्वच तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. तर आगामी सर्वच निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे. तसेच काही ठिकाणी समविचारी पक्षांशी आघाडी केली जाईल. तर ग्रामपंचायत निवडणुकीत नेहमीच गाव पॅनेलला पाठिंबा दिला जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात सदस्य नोंदणीवर अधिक भर दिला जाणार असून  जनतेच्या प्रश्‍नांसाठीही काँग्रेस पक्ष जनतेचा आवाज म्हणून काम करणार असल्याचे विकास सावंत यांनी स्पष्ट केले.