होमपेज › Konkan › मालवणच्या भुयारी गटार कामाला पुन्हा प्रारंभ

मालवणच्या भुयारी गटार कामाला पुन्हा प्रारंभ

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:37PMमालवण : प्रतिनिधी

मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. शिल्लक राहिलेली दोन किलोमीटरची पाईपलाईन आणि इतर सर्व कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने पालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सर्व नगरसेवक, प्रशासन आणि ठेकेदार यांची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्षांच्या कक्षात झाली.

मालवण नगरपालिकेत गेले अनेक महिने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादाचे प्रसंग सभागृहात विविध विषयांवर दिसून आले होते. यातून भुयारी गटार योजनेवर वारंवार वादळी चर्चा झाली. यामुळे नगराध्यक्षांनी भुयारी गटार योजना प्रश्‍न निकाली काढण्यासाठी आयोजित बैठकीस सर्व नगरसेवकांनी या बैठकीस उपस्थित राहात योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे संकेत दिलेे. या कामात अडचणी असलेल्या ठिकाणी प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. 

भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शासनाने नव्याने आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी तातडीने खर्च करण्यासाठी सदर काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे  तसेच दर आठवड्याला या कामाचा आढावा देण्याचे शासन आदेश आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली. शहरात काही ठिकाणी भुयारी गटार योजनेची पाईपलाईन टाकण्याबाबत वाद असल्याने संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, महिला बालकल्याण सभापती तृप्ती मयेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ममता वराडकर, पूजा करलकर, सुनीता जाधव, तसेच बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.