Sun, Sep 23, 2018 13:50



होमपेज › Konkan › ‘सिंधु-2’ गस्ती नौका पुन्हा सागरी गस्तीसाठी सज्ज

‘सिंधु-2’ गस्ती नौका पुन्हा सागरी गस्तीसाठी सज्ज

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 8:55PM

बुकमार्क करा





मालवण : वार्ताहर 

काही दिवसांपूर्वी ओखी चक्रीवादळामुळे समुद्राला आलेल्या उधणाचा तडाखा बसून नादुरुस्त झालेली सिंधू-2 ही सागरी पोलिसांची गस्ती नौका दुरुस्तीनंतर सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा समुद्रात लोटण्यात आली. त्यामुळे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सिंधू-2 गस्तीनौका पुन्हा सज्ज झाली आहे. ओखी चक्रीवादळामुळे समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका मालवण बंदरात नांगरून ठेवलेल्या सिंधू-5 व सिंधू-2 या सागरी पोलिसांच्या गस्तीनौकांना बसला होता.

यामध्ये सिंधू-5 ही नौका समुद्रात बुडाली होती. तर सिंधू-2 या नौकेच्या इंजिन मध्ये पाणी गेल्याने ती नादुरुस्त झाली होती.  या दोन्ही नौका पोलिसांनी मच्छीमार व किल्ला होडी व्यावसायिकांच्या मदतीने किनार्‍यावर आणून ठेवल्या होत्या.त्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी या नादुरुस्त नौकांची पाहणी करून सिंधू-2 नौका लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानुसार ही नौका दुरुस्त केल्यानंतर   सोमवारी ती समुद्रात लोटण्यात आली. 

सिंधू-2 नौका  समुद्रात लोटण्यासाठी चार तासांचा अवधी लागला. सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, एस.पी. खांदारे, पोलीस कर्मचारी पवार, चव्हाण, टोकाळे, नौका कर्मचारी आर.पी. तारी, के.ई. कुमठेकर, एस.एस. शेलटकर, ए.जी. ढोके, एस.ए. पावसकर यांनी जेसीबीच्या साहाय्याने ही नौका समुद्रात लोटली. सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सागरी गस्तीसाठी रत्नागिरी येथील दोन ट्रॉलर्स भाडेतत्वावर घेतले असून त्याद्वारे सागरी गस्त सुरु आहे. आता सिंधू 2 या गस्तीनौकेतून सागरी गस्तीला सुरुवात करण्यात येईल,  उपनिरीक्षक अनिल साठे यांनी सांगितले.  सिंधू 2 गस्तीनौका पुन्हा सागरी गस्तीसाठी सज्ज झाल्याने मच्छिमार बांधवानी समाधान व्यक्त केले आहे.