Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Konkan › शिवसेनेने मच्छीमारांच्या प्रश्‍नांचे राजकारणच केले

शिवसेनेने मच्छीमारांच्या प्रश्‍नांचे राजकारणच केले

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 9:53PMमालवण : प्रतिनिधी

पालकमंत्री गोव्यातील मच्छीमारांची बाजू घेतात. तर आमदार, खासदार केवळ फोटोसेशनचे काम करतात. परराज्यातील बोटी येथील मासळी लुटून नेतात. स्थानिक मच्छिमार यात होरपळला आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अन्याय सहन करण्याची सवय नाही. महाराष्ट्रात या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. हा जिल्हा अन्याय सहन करत नाही ही भावना इतर जिल्ह्यात आहे ती बदलू देऊ नका. मच्छिमारांच्या अन्यायाला वाचा फोडत स्वाभिमान पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहाणार आहे. अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे यांनी बोलताना व्यक्त केली.    

दरम्यान सिंधुदुर्गच्या समुद्रात घुसखोरी करून मासळीची लूट करणार्‍या परराज्यातील ट्रॉलर्स (तीन बोटी) मालवण समुद्राबाहेर गेल्या तर मोठा संघर्ष उभा राहिल. त्यांनतर शांततेने मोर्चे निघणार नाहीत गनिमी काव्याने मोर्चे निघतील असा इशाराही निलेश राणे यांनी दिला. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने मच्छीमारांवर होणार्‍या अन्यायाबाबत मंगळवारी मालवणात प्रथमच भव्य मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे यांनी केले. मोर्चासमोर बोलताना निलेश राणे म्हणाले, पक्षाला उभारी मिळावी म्हणून हा मोर्चा काढला नाही तर मच्छीमारांवर अन्याय  थांबला पाहिजे. यासाठी आहे. सिंधुदुर्गच्या समुद्रात राजरोसपणे परराज्यातील बोटी येऊन मच्छीमारी करतात, इथल्या मच्छीमारांना त्रास देतात. मात्र या पुढे आता कोणाला घाबरायची गरज नाही असेही राणे म्हणाले. 

 गोव्याचे ट्रॉलर्स पकडल्यापासून गोव्याने सिंधुदुर्गचे मासे बंद घ्यायचे बंद केले. मात्र या विषयावर आमदार, पालकमंत्री बोलत नाहीत. परराज्यातील ट्रॉलर मालकांचा  पालकमंत्र्यांना  पुळका येतो.  स्थानिक मच्छीमारांवर झालेली कारवाई योग्यच आहे असे पालकमंत्री म्हणतात. पालकमंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य आमच्या मच्छीमारांसमोर करून दाखवावे असे आव्हान निलेश राणे यांनी दिले. शिवसेनेने सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या. मोर्चा होऊ नये यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. मात्र, मच्छीमारांनी तो प्रयत्न  हाणून पाडला. सत्तापालट करण्याची ताकद मच्छीमारांमध्ये आहे, आम्ही कायद्याच्या  चौकडीत राहून काम करतोय, पुढेही करणार आहोत. अंगावर आलात तर त्याच भाषेत उत्तर देऊ. सिंधुदुर्ग असो अथवा रत्नागिरी असो आमच्या  मच्छीमार बांधवांना छळू नका, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष उभा राहील असा इशारा दिला.