Wed, Aug 21, 2019 02:49होमपेज › Konkan › मालवणला उधाणाचा तडाखा

मालवणला उधाणाचा तडाखा

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 11:11PMमालवण/देवगड : प्रतिनिधी

मालवण किनारपट्टीला सलग चौथ्या दिवशी समुद्री उधाणाचा जोरदार तडाखा बसला. किनारपट्टीलगत असलेल्या देवबाग गावात समुद्राचे पाणी हॉटेल परिसर तसेच रस्त्यावर घुसले. अनेक ठिकाणी बंधारा वाहून गेला असून किनारपट्टीचा काही भाग समुद्राने गिळंकृत केला आहे. देवबाग संगम येथील स्मशामभूमीही वाहून गेली आहे.  किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. खवळलेल्या समुद्राच्या जोरदार लाटांनी किनारपट्टी हादरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरीवर सरी सुरू आहेत. गडनदी, रमाई नदी पूररेषेवरून वाहत आहे. मसुरे व लगतच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर बनला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याचे चित्र होते. 

दरम्यान, सरपंच जान्हवी खोबरेकर, पं. स. सदस्य मधुरा चोपडेकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, मनोज खोबरेकर व अन्य सदस्य यांनी किनारपट्टीची पाहणी केली व ग्रामपंचायत येथे तातडीची बैठक घेत उपाययोजनांबाबत आढावा घेतला. उधाणाचा व वार्‍यांचा जोर आणखी काही दिवस असाच राहणार असून आषाढी एकादशीला उधाणाचा जोर वाढण्याची भीती आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देवबाग सरपंच व लोकप्रतिनिधी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असून फुटलेल्या बंधार्‍याच्या ठिकाणी किनारपट्टीवर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याची मागणी केली जाणार आहे. आचरा, तळाशील व तोंडवळी किनारपट्टीलाही उधाणाचा जोर दिसून आला. मालवण बंदर जेटी येथे जोरदार लाटा धडकत होत्या. समुद्री उधाणासोबत किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. हडी-गावकरवाडी येथील शंकर विष्णू गावकर यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. 

कलंडलेल्या धोकादायक खांबांवरून वीजपुरवठा

समुद्र किनारपट्टीवर अगदी बंधार्‍यालगत उभारण्यात आलेल्या वीज खांबांवरून संपूर्ण देवबाग गावास वीजपुरवठा होतो. बंधार्‍याचे दगड कोसळल्याने वीज खांबही कलंडले आहेत. धोकादायक खांबांवरून संपूर्ण गावास वीजपुरवठा सुरू आहे. उधाणाचा जोर कमी झाल्याशिवाय वीज खांब बदलणे शक्य नसल्याचे चित्र आहे. कर्ली खाडीच्या संगमावर देवबाग गावची स्मशानभूमी आहे. मात्र, पावसात मोठ्या उधाणात स्मशानभूमीत पाणी घुसते. मात्र गेले चार दिवस सातत्याने येणार्‍या उधाण स्थितीने संपूर्ण स्मशानभूमीच समुद्राने गिळंकृत केली. दरम्यान समुद्रात वाहून जाणारी शवदाहिनी ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने बांधून खाजगी जागेत ठेवली आहे. 

वादळी वार्‍याचा फटका मिठमुंबरी किनारपट्टीला बसला असून किनारपट्टीवर केलेली बैठक व्यवस्था व त्यावरील छप्पर वार्‍याने उडून जावून नुकसान झाले आहे.देवगड तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाबरोबरच वादळी वार्‍याचा जोर होता. वादळी वार्‍यामुळे मिठमुंबरी समुद्रकिनारी ग्रामपंचायती मार्फत बसविण्यात आलेला चेजिंग रूम पलटी झाला. तर मिठमुंबरी- कुणकेश्‍वर सागरी मार्गालगत स्थानिकांनी पर्यटकांना बसण्यासाठी केलेली बैठक व्यवस्था व त्यावरील पत्र्यांचे छप्पर उडून गेल्याने नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याचा जोर कायम असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू होते.