Thu, Jun 27, 2019 18:06होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : सभापतींनी शिवीगाळ केल्याचा सफाई कामगारांचा आरोप

सिंधुदुर्ग : सभापतींनी शिवीगाळ केल्याचा सफाई कामगारांचा आरोप

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:19PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

मालवण पालिकेचे चतुर्थ श्रेणी कामगारांना आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक आरोप कामगारांनी केला आहे. आम्ही 25 ते 30 वर्षे नित्यनेमाने काम करत असून शाबासकी द्यायची सोडून त्यांच्याकडून मानसिक खच्चीकरण केले जात आहे, असे सांगत पालिकेच्या सफाई कामगारांनी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह नगरसेवकांकडे व्यथा मांडल्या. 

दरम्यान, मुख्याधिकारी रंजना गगे यांना बुधवारी सकाळी सफाई कामगार निवेदन देणार आहेत. आरोग्य सभापतींच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी निवेदनाद्वारे दिला.

पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांनी उपनगराध्यक्षासह नगरसेवकांकडे व्यथा मांडत न्याय मागितला. सूर्यकांत राजापूरकर, आनंद वळंजू, सुधाकर कासले, अनिता शिगले, सचिन कासले, भूषण जाधव, सखाराम हासोळकर, सुधीर आचरेकर, कृष्णा कांबळे, मनोहर जाधव, बाळकृष्ण जाधव, किशोर जाधव, सावित्री मालवणकर, राजश्री मालवणकर आदी कामगारांनी आपल्या स्वाक्षरांचे निवेदनातून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, आम्ही पालिकेत 25-30 वर्षे नित्यनेमाने काम करून कधीही कामात दिरंगाई केलेली नाही. 

22 डिसेंबर रोजी सकाळी आम्ही कामावर अर्धातास हजर राहिलो असताना आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यांचे असे प्रकार वर्षभरापासून सुरू आहेत. मात्र आता सहन न झाल्याने त्यांची तक्रार करत आहोत. आमचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असा वारंवार उल्लेख करून आम्हाला हीन दर्जाची वागणूक लुडबे देत आहेत. 

कामगारांची मानहानी करण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. आम्ही चांगले काम करत असताना त्यांनी आम्हाला शाबासकी देण्याऐवजी मानसिक व खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष केला. मात्र त्यांनी शिवीगाळ केल्याने त्यांचा निषेध म्हणून बुधवारी कामबंद आंदोलन करणार असे म्हटले आहे.