Sat, Jul 20, 2019 13:15होमपेज › Konkan › मसुरे येथे घरफोडी; चारजणांना अटक

मसुरे येथे घरफोडी; चारजणांना अटक

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 10:26PMमालवण : प्रतिनिधी

मसुरे-विकासवाडी येथील एका बंद घराची कौले काढून आतील तांब्या, पितळीची सुमारे 73 हजार 400 रुपयांची भांडी चोरल्याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अवघ्या बारा तासांत गजाआड केले. अन्य एका संशयितास लवकरच गजाआड केले जाणार आहे. संशयितांनी विकलेली भांडी जप्त करण्यात आली आहेत. पैकी तीन जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. एका संशयितास शनिवारी (दि.28)न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार जाकीन डॉमनिक डिमेलो (74 रा. मसुरे-विकासवाडी) यांनी येथील पोलिस ठाण्यात काल दिली. 

मसुरे-विकासवाडी येथील जाकीन डिमेलो यांचे घर बंद असल्याने याचा फायदा संशयितांनी उठवित तांब्या, पितळीची भांडी लांबविली. 19 मार्च ते 20 एप्रिल या कालावधीत संशयित आरोपींनी बंद घराची कौले काढून आतील तांब्याची चार मडकी, दोन तपेली, एक परात, एक कळशी, एक झाकण, चार पितळीचे टोप, चार काशाचे बाऊल अशी सुमारे 73 हजार 400 रुपयांची भांडी चोरून नेली. सात दिवसांपूर्वी या घराचे बांधकाम करण्यासाठी श्रीमती डिमेलो या कामगारांसह घरी गेल्या असता त्यांना घरातील भांडी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्या मुंबईस गेल्या होत्या. काल येथे आल्यावर त्यांनी पोलिस ठाणे गाठत याबाबतची रीतसर तक्रार दाखल केली. 

तक्रार दाखल केल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी विठ्ठल जोशी, रूपेश गुरव, नितीन शेडगे, विल्सन डिसोझा, रूपेश सारंग, मंगेश माने, आशिष कदम यांच्या पथकाने बारा तासाच्या आत बस्त्याव लॉरेन्स लोबो (59), लॉरेन्स बस्त्याव लोबो (23, दोन्ही रा. मसुरे-विकासवाडी), प्रथमेश मारूती गाडे (19, रा. मसुरे मार्गाचीतड) या तिघांना गजाआड केले. 

रात्री उशिरा या तिघांवर घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींनी चोरलेली तांब्या, पितळीची भांडी शहरातील सोमवार पेठेतील महेश विजय गिरकर (45) याला टप्प्याटप्प्याने विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गिरकर याच्याकडून विकलेली सर्व भांडी जप्त केली. यात चोरीची भांडी विकत घेतल्याप्रकरणी महेश गिरकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत आज त्याला अटक करण्यात आली. उद्या 28 रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या चोरी प्रकरणात आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.