Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Konkan › फ्रॅक्चर असूनही वधू विवाहासाठी लग्नमंडपात उभी

फ्रॅक्चर असूनही वधू विवाहासाठी लग्नमंडपात उभी

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 9:45PMमालवण : प्रतिनिधी

नवरी मुलगी विवाहासाठी निघालेल्या गाडीला अपघात होवून नवरी मुलींसह तिचे नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी कसाल-कट्टा मार्गावर घडली. मात्र फ्रॅक्चर झालेल्या हातावर उपचार घेत नवरी लग्न मंडपात दाखल झाली आणि विवाह निर्विघ्न पार पडला. दरम्यान, नवरी मुलीने दाखवलेल्या या धैर्याचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. 

कसाल मार्गालगत असलेल्या एका गावातील मुलीचा विवाह मालवण तालुक्यातील एका मुलाशी शनिवारी दुपारी 12.30 च्या मुहूर्तावर कट्टा येथील एका सभागृहात निश्‍चित करण्यात आला होता. मात्र विवाह स्थळी येण्यास येण्यास निघालेल्या नवरी मुलगी असलेल्या गाडीची धडक ब्लड बँकेच्या गाडीला पडवे येथे बसली. गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होत नवरी मुलगीसह तिचे आई-वडील, बहीण व चालक असलेला भाऊ जखमी झाले. 

नवरीला लागलीच लगतच्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये तर चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवरी व तिच्या नातेवाईकांवर उपचार करेपर्यंत साडेबाराचा मुहूर्त चुकला. मात्र काही झाले तरी लग्न करणारच असा निश्‍चय केलेल्या नवरी व मुलाच्या नातेवाईकांनी दुपारी 3 चा मुहूर्त काढला.

उपचार घेतल्यानंतर होणार्‍या वेदना सहन करत नवरी मुलगी व तिचे नातेवाईक दुपारी दोन वाजता लग्न मंडपात दाखल झाले. नातेवाईक व मित्रपरिवार सगळेच थांबून होते. अखेर सर्वांच्या साक्षीने विवाह सोहळा निर्विघ्न पार पडला. नवरी मुलीने दाखवलेल्या धैर्याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू होती.