Sun, May 26, 2019 13:00होमपेज › Konkan › ...तर ‘किल्‍ले दर्शन’ होडी सेवा बंद!

...तर ‘किल्‍ले दर्शन’ होडी सेवा बंद!

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 10:50PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

 सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला  असून  शासन स्तरावरून प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत शासनाचा निषेध म्हणून ‘किल्ले दर्शन’ होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा  इशारा अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिला आहे. 

मालवणात पर्यटनासाठी  येणार्‍या लाखो पर्यटकांना ऐतिहासिक किल्ले दर्शनाची सफर घडविणार्‍या होडी व्यावसायिकांच्या अनेक मागण्या पाठपुरावा करूनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे मालवण बंदर जेटी येथे पर्यटकांना सोयी-सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांच्या रोषाला होडी व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे.सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने  यापूर्वी निवेदनातून मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, बंदर विकास राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, बंदर अधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. 

 बंदर जेटी येथे आमचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमचा वडिलोपार्जित किल्ला प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. मात्र बंदर जेटीवर असलेल्या गैरसोयींमुळे पर्यटकांच्या रोषाला होडी व्यावसायिकांना सामोरे जावे लागते. बंदर जेटी येथील गाळ काढण्यात न आल्याने पौर्णिमा व अमावास्या दिवशी जेटीवर होड्या लावता येत नाही. परिणामी पर्यटकांना तीन बोटी एकत्र करून प्रवाशांना न्यावे लागते. नाहीतर पर्यटकांना किल्ले दर्शनाअभावी माघारी परतावे लागते. तर सिंधुदुर्ग किल्ला येथे असलेल्या जेटीवर प्रवासी शेड नाही. त्या जेतीला सुरक्षित होडी लावता येत नसल्याने चनल मोकळा करून मिळावा. बंदर जेटीच्या कामाचा तीन वर्षापूर्वी शुभारंभ झाला, त्यामुळे अद्ययावत जेटीचे काम मार्गी केव्हा लागणार ? असाही सवाल उपस्थित केला आहे. जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे वेंगुर्ले येथे असलेले कार्यालय ओरोस येथे असणे आवश्यक आहे. सर्व्हे प्रमाणपत्रांची वैधता एक वर्षावरून पाच वर्षे करण्यात यावी. उतारू परवान्याची वैधताही पावसाळी हंगाम वगळून पाच वर्षांसाठी करण्यात यावी. थर्ड पार्टी इन्शुरन्स पाच लाखावरून एक लाखापर्यंत करण्यात यावी. प्रवासी होडीची नोंदणी करतना प्रवासी संख्या 20 पेक्षा अधिक निर्धारित करावी. नवीन फायबर बोटीन मालवण बंदर जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला या मार्गावर परवानगी देण्यात येवू नये. तर पर्यटकांसाठी बांधण्यात आलेला वाहनतळ तत्काळ सुरु करण्यात यावा. -प्रादेशिक बंदर विभागाच्या ऑनलाईन सेवांमुळे सर्व व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेवा सुरळीत होईपर्यंत नौकांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.