Fri, Jan 18, 2019 18:01होमपेज › Konkan › अबब...मासळी संपता संपेना!

अबब...मासळी संपता संपेना!

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 10:48PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर 

रविवारी वायरी येथील नारायण तोडणकर यांच्या रापणीस तारली मासळीची बंपर कॅच मिळाला. बर्‍याच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी मिळाल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.  किनार्‍यावर ओढलेली ही मासळी गोळा करण्याचे काम सोमवारी  दुसर्‍या दिवशीही सुरूच होते. रात्रभर मासळी ओढून ती वाहनांमधून पाठविण्यासाठी प्रथमच जेसीबीचा वापर करण्याची वेळ मच्छीमारांवर आली.

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरलेले मच्छीमार नव्या जोमाने मासेमारीस उतरले होते. यातच  तारली मासळीचा बंपर कॅच मिळाल्याने मच्छीमार सुखावले आहेत. सुमारे तीनशे खंडीहून अधिक तारली मासळी किनार्‍यावर ओढण्यात आली. अनेक वषार्ंनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रापणीस तारली मासळी मिळाल्याचे येथील वृद्ध मच्छीमारांनी सांगितले.  एक ते दीड किलोमीटर लांबीच्या परिसरात सापडलेली मासळी गोळा करून मच्छीमार हैराण झाल्याचे दिसून येत होते. अखेर रात्री जेसीबी मागवून ही मासळी गोळा करत ती वेगवेगळ्या वाहनांमधून पाठविण्याचे काम सुरू केले.  सोमवारी  दुसर्‍या दिवशीही किनार्‍यावर ही मासळी ओढण्याचे काम सुरू होते. रात्रभर मासळी गोळा करून मच्छीमार दमल्याने परप्रांतीय कामगारांना मदतीसाठी घेण्यात आले.

तारली मासळीचा वापर तेल काढण्यासाठी वापरला जातो. ही मासळी नासली तरीही त्याचा तेलासाठी वापर होतो.  रात्रभर विविध वाहनांमध्ये ही मासळी भरून निवती, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, हुबळी याठिकाणी पाठविण्याचे काम सुरू होते.  अजूनही उर्वरित मासळी गोळा करण्यास आणखी एक दिवस लागेल अशी परिस्थिती आहे. या मासळीमुळे रापणकर संघास लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.