Wed, Apr 24, 2019 02:02होमपेज › Konkan › ‘ओखी’चा जिल्ह्याला तडाखा

‘ओखी’चा जिल्ह्याला तडाखा

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:16PM

बुकमार्क करा

मालवण/देवगड/वेंगुर्ले : प्रतिनिधी

दक्षिणेकडे घोंगावत असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीला बसला आहे. या वादळामुळे सिंधुदुर्गच्या समुद्र किनार्‍यालाही तडाखा बसला आहे. मालवणात पोलिसांच्या दोन गस्तीनौका बुडाल्या आहेत. त्यातील एक गस्तीनौका बाहेर काढण्यात आली; मात्र दुसरी गस्तीनौका काढण्यास अपयश आले आहे. या नौकांवरील पोलिस मात्र बचावले. देवगड बंदरात गुजरातपासून दक्षिणेकडील केरळ व तामिळनाडू राज्यातील मिळून सुमारे हजारभर बोटींनी आश्रय घेतला आहे. वेंगुर्ले किनार्‍यावर बोट व मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

देवगडात गेल्या चार दिवसांपासून बंदरावर परराज्यातील बोटी लागत आहेत. समुद्रात वादळसद‍ृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात बोटी लावण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. केरळ राज्यातील पोलिस अधिकार्‍यांनी देवगड बंदराला भेट देऊन केरळ राज्यातील नौका चालकांशी चर्चा करून त्यांना सावधानतेचे उपाय सुचविले आहेत, त्याशिवाय मदतही केली आहे. गुजरातमधील अनेक नौका सिंधुदुर्ग, रत्नागिरी समुद्रात मच्छीमारीसाठी आल्या होत्या. त्या नौका देवगडमध्ये आश्रयाला आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा नौका देवगड बंदरामध्ये एकवटलेल्या आहेत. 

वेंगुर्ले तालुक्यातील शहरापासून जवळच असलेल्या मूठ-कुर्लेवाडी किनारी भागाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या ठिकाणचा भाग हा समुद्राला लागूनच असल्यामुळे रविवारी मध्यरात्री समुद्राचे पाणी मच्छीमारांच्या बोटीलगत शिरले.

... अन् फयान वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या!
     पाच-सहा वषार्ंंपूर्वी महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर फयान वादळ आले होते. या वादळाच्या तडाख्याने वेंगुर्ले, मालवण, देवगड किनार्‍याला मोठा तडाखा बसला होता. देवगड भागातील अनेक मच्छीमार नौकांसह समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. या वादळात किनार्‍यावरील अनेक घरे, माड जमीनदोस्त झाले होते. जाळी वाहून गेली होती. ओखी चक्रीवादळामुळे ‘फयान’च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

कोकणातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी एक परिपत्रक काढून कोकणातील म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर येथील शाळा, महाविद्यालयांना 5 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.