Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Konkan › मालवणात सागराला नारळ अर्पण

मालवणात सागराला नारळ अर्पण

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:53PMमालवण : प्रतिनिधी

शिवकाळापासून चालत आलेल्या नारळी पौर्णिमा उत्सवास प्रथेप्रमाणे किल्ले सिंधुदुर्गवरील तोफ धडाडली, अन् हजारो नागरिकांनी सागराला श्रीफळ अर्पण केला. मालवणात दरवर्षी शिवकालीन परंपरेनुसार नारळी पौर्णिमा उत्सव साजरा होतो. शनिवारी सकाळपासून किल्ले सिंधुदुर्गवर नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व देवदेवतांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यानंतर दुपारी 3 वा.च्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचा श्रीफळ अर्पण करण्यात आला. 

मालवण बाजारपेठ हनुमान मंदिर येथून व्यापारी बांधवांनी भव्य मिरवणूक काढली. व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्यासह व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि व्यापारी बांधव एकत्र आले  होते. ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुकीत मच्छीमार महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर श्रीफळ व कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. बंदर जेटीपर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढल्यानंतर समुद्र किनार्‍यावर व्यापारी संघातर्फे आणण्यात आलेल्या श्रीफळाचे विधिवत पूजन करण्यात आले. उमेश नेरुरकर यांनी व्यापारी बांधवांच्या वतीने सागराला श्रीफळ अर्पण करून ‘मालवणवासीयांच्या धंद्यात बरकत दी आणि सगळ्यांका सुखी ठेव’असे गार्‍हाणे घातले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, नितीन वाळके, यतीन खोत, स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह अन्य उपस्थित होते.

मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिध्द असल्याने मालवणसह जिल्हावासीयांनी गर्दी केली होती. यामध्ये आबालवृद्धांसह सर्व सहभागी झाले होते. तर तरुणाईमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. यामुळे सारा बंदर जेटी परिसर व समुद्र किनारा गर्दीने फुलून गेला होता. बंदर जेटीवर विविध खाद्यपदार्थ, शीतपेय व खेळण्यांची दुकाने मांडण्यात आली होती. नारळ लढविण्यासाठी जेटीवर नारळ विक्रेत्यांचेही अनेक स्टॉल लागले होते.

यावेळी बंदर जेटी परिसरात युवक व बच्चेकंपनीमध्ये नारळ लढविण्याचा खेळ रंगला.तसेच आट्यापाट्या व महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचाही थरार रंगला. यावर्षी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित पुरुषांसाठी भव्य अशी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी व माजी खा. नीलेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ व सौ. शिल्पा खोत आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा तसेच मालवणी संस्कृती व वारसा मंडळ मालवण यांच्या वतीनेही जिल्ह्यातील महिला वर्गासाठी नारळ लढविणे स्पर्धा यावेेळी रंगली.