Sun, Apr 21, 2019 04:05होमपेज › Konkan › गोव्यातील बोटी मंगळवारपर्यंत मालवणातच

गोव्यातील बोटी मंगळवारपर्यंत मालवणातच

Published On: Feb 18 2018 1:59AM | Last Updated: Feb 17 2018 10:56PMमालवण : प्रतिनिधी

गोव्याच्या बोटींवर एलईडी मासेमारीचे साहित्य असल्याने तहसीलदार यांनी चौकशी करून कठोर कारवाई करावी, असे निवेदन मालवणातील मच्छीमारांच्या वतीने तहसीलदार समीर घारे यांच्याकडे सादर केलेे. दरम्यान,  अ‍ॅड. उल्हास कुळकर्णी यांनीही मच्छीमारांची बाजू आक्रमकपणे  मांडली. अखेर बोट प्रकरणावर अंतिम सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी सुनावण्यात येईल, असे घारे यांनी जाहीर केले. गोव्याच्या बोटींचा मालवण बंदरातील मुक्‍काम किमान तीन दिवस वाढला आहे. दरम्यान, सात मच्छीमारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

गोवा बोट मालकांच्या वतीने अ‍ॅड. रूपेश परूळेकर यांनी बाजू मांडली. तर मच्छीमारांच्या वतीने तहसीलदारांसमोर बाजू मांडताना अ‍ॅड. कुळकर्णी यांनी गोव्याच्या बोटींवर एलईडी मासेमारी करण्याचे साहित्य होते. यामुळे तहसीलदार यांनी तीनही बोटींची स्वतः पाहणी करावी. एलईडी मासेमारीवर कडक निर्बंध असल्याने संबंधितांवर तशाप्रकारे कारवाई करण्यात यावी, असेही 
सांगितले.

गोवा बोटींचा मालवण बंदरातील मुक्‍काम वाढल्याने मच्छीमारांनी समाधान व्यक्‍त केले आहे. गोव्याच्या बोटींवरील मासळीची आणि साहित्याची लूट केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना यांच्यासह सातजणांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मच्छीमारांच्या वतीने अ‍ॅड. उल्हास कुळकर्णी, अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कोठडीसाठी मच्छीमारांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे. मच्छीमारांना जामीन होण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालयाच्या आवाराबाहेर पारंपरिक मच्छीमारांनी गर्दी केली होती. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.