Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Konkan › आचर्‍यात स्वाभिमान पुरस्कृत ग्रामविकासचा झेंडा

आचर्‍यात स्वाभिमान पुरस्कृत ग्रामविकासचा झेंडा

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:47PMमालवण : प्रतिनिधी 

 जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्राम विकास पॅनेलने गाव विकास पॅनेलचा एकतर्फी धुव्वा उडवीत आठ जागांवर विजय मिळविला. गाव विकास पॅनेलचे तीन तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले. सरपंच निवडणुकीत ग्राम विकासच्या प्रणया टेमकर यांनी गाव विकास पॅनेलच्या ललिता पांगे यांचा 831 मतांनी पराभव केला. ग्राम विकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविल्यानंतर तहसील कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला.

दरम्यान, ग्राम विकास पॅनेलच्या आठ तसेच दोन अपक्ष उमेदवारांवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाने आपला दावा केला आहे. तीन जागांवर शिवसेना-भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. 

तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया  मंगळवारी झाली. या निवडणुकीत 70 टक्के मतदान झाले. बुधवारी मालवण तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया तहसीलदार समीर घारे यांच्या उपस्थितीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी वसंत महाले, नायब तहसीलदार सुहास खडपकर, साईनाथ गोसावी, रवी तारी, श्री. मांजरेकर, श्री. म्हसकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आचरा सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सरपंचपदासह 13 सदस्य जागांसाठी ही निवडणूक पार पडली. सरपंचपदाची दुरंगी लढत तर 13 जागांसाठी 37 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात दहा जागांसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी मंगेश टेमकर (ग्राम विकास पॅनेल), मुजफर मुजावर (अपक्ष), पांडुरंग वायंगणकर (ग्राम विकास पॅनेल), दिव्या आचरेकर (शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनेल), योगेश गावकर (शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनेल), अनुष्का गावकर (शिवसेना गाव विकास पॅनेल), लवू घाडी (ग्राम विकास पॅनेल), वैशाली कदम (ग्राम विकास पॅनेल), श्रद्धा नलावडे (ग्राम विकास पॅनेल) व वृषाली आचरेकर (ग्राम विकास पॅनेल) यांनी एकतर्फी विजय मिळविला. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी दोन्ही अपक्ष उमेदवार हे ग्राम विकास पॅनेलचे असल्याचा दावा करण्यात आला. 

तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत निवडणूक असल्याने आचरा गावाची निवडणूक राजकीय पक्षांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. शिवसेना  जिल्हाप्रमुख आ.वैभव नाईक, भाजपचे चिटणीस राजन तेली यांच्यासह माजी खा. नीलेश राणे  आचरा गावात ठाण मांडून होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर कोण वर्चस्व मिळविते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आचरा ग्राम विकास पॅनेलला स्वाभीमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला होता. तर शिवसेना-भाजप पुरस्कृत गाव विकास पॅनेलने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मतमोजणीत ग्राम विकास पॅनेलने एकहाती वर्चस्व सिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अशोक सावंत, नीलिमा सावंत, मंदार केणी, बाबा परब, यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. 

सरपंच पदी प्रणया टेमकर

थेट सरपंच निवडणुकीसाठी  दुरंगी लढत झाली. ग्राम विकास पॅनेलच्या प्रणया टेमकर आणि शिवसेना पुरस्कृत ललिता पांगे यांच्यात लढत झाली. दोघांमधील लढत काटे की टक्कर अशी होईल, अशी शक्यता होती. मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रणया टेमकर या आघाडीवर राहिल्या. प्रणया टेमकर यांनी 1731 मते मिळवत ललिता पांगे यांचा 831 मतांनी पराभव केला. प्रणयाचे वडील माजी सरपंच मंगेश टेमकर यांनीही प्रभाग पाचमधून सदस्य पदाची निवडणूक लढविताना सुनील खरात व चंद्रशेखर भोसले यांचा दारुण पराभव करत 133 मतांनी विजय मिळविला. सरपंच म्हणून प्रणया टेमकर विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आचरेवासियांनी तहसील कार्यालय परिसरात एकच जल्लोष केला.  

प्रभाग निहाय विजय उमेदवार प्रभाग 1 - पांडुरंग धोंडू वायंगणकर (200, विजयी), किशोर तुकाराम कांबळी (95), समीर रघुवीर बावकर (81), नोटा (3). रेश्मा रामदास कांबळी (166 विजयी), कीर्ती किशोर पेडणेकर (53), शिवानी चंद्रशेखर मुणगेकर (149), नोटा (11). प्रभाग 2 - मुजफर बशीर मुजावर (265 विजयी), प्रमोद विष्णू कोळंबकर (101), सतीश भिवा तळवडकर (91), नोटा (3). दिव्या जितेंद्र आचरेकर (211 विजयी), संचिता गोविंद आचरेकर (14), कांचन कमलाकर करंजे (94), गौरी चंद्रशेखर सारंग (97), नोटा (44). प्रभाग 3 - योगेश गोविंद गावकर (299 विजयी), मंगेश परशुराम मेस्त्री (229), नोटा (15). राजेश कृष्णा पडवळ (161, विजयी) रवींद्र गंगाराम बागवे (136), जुबेर मोहिद्दीन काझी (112), सुनील सूर्यकांत सावंत (127), नोटा (7). अनुष्का प्रशांत गावकर (306, विजयी), नीता प्रकाश पांगे (211), नोटा (26). प्रभाग 4 - लवू तुकाराम घाडी (292, विजयी), सचिन सत्यविजय परब (218), रूपेश मनोहर साटम, (62), नोटा (14). श्र्र्द्धा विजय नलावडे (319,विजयी), करिष्मा विलास सक्रु (251), नोटा (16). वैशाली शैलेश कदम (300,विजयी), रिया रूपेश घाडी (269), नोटा (17). प्रभाग 5 - मंगेश दिगंबर टेमकर (414 विजयी), सुनील सोनू खरात (281), चंद्रशेखर कमलाकांत भोसले (27), नोटा (7). वृषाली विलास आचरेकर (586 विजयी), युगंधरा तुषार मोर्जे (110), नोटा (33). ममता महेश मिराशी (543 विजयी), कांचन कमलाकर करंजे (163), नोटा (23).