Fri, Nov 16, 2018 13:12होमपेज › Konkan › चिपी विमानतळासाठी विजेसह राष्ट्रीय महामार्गास विरोध

चिपी विमानतळासाठी विजेसह राष्ट्रीय महामार्गास विरोध

Published On: Aug 24 2018 10:35PM | Last Updated: Aug 24 2018 9:54PMमालवण : वार्ताहर

चिपी विमानतळासाठी कुंभारमाठ येथून विद्युत खांब, वीज वाहिन्या ओढण्यास तसेच या भागात होणार्‍या नव्या राष्ट्रीय महामार्गास आपला विरोध असल्याचे सांगत  ग्रामस्थांना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने सर्व अधिकार्‍यांनी ग्रामस्थांसमवेत होणार्‍या  पुढील बैठकीत पूर्ण माहितीसह ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. 

आठ दिवसांपूर्वी कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे चिपी विमानतळासाठी वीज पुरवठा करण्यास महावितरणच्या ठेकेदाराने कुंभारमाठ सागरी महामार्ग येथून सुरू केलेल्या सर्व्हेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी कुंभारमाठ ग्रामपंचायत कार्यालय  येथे  ग्रामस्थांची बैठक झाली. उपसरपंच बाळा माने, विनोद भोगावकर, प्रिया लंगोटे, ग्रामसेवक गणेश नलावडे,सा. बां. चे अधिकारी प्रकाश चव्हाण,महावितरण कुडाळचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत कांबळे, सहाय्यक अभियंता अमित तारापुरे यांच्यासह  ग्रामस्थ  उपस्थित होते.

बैठकीत कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग सा. बां.विभागाच्या अखत्यारीत नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच हा महामार्ग येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. त्यामुळे आता विद्युत खांबास जागा दिल्यास भविष्यात आणखी जागा जाणार असल्यानेच आमचा वीज वाहिन्या ओढण्यास तसेच होऊ घातलेल्या राष्ट्रीय महामार्गास तीव्र विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चर्चेवेळी येथील सागरी महामार्ग अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले. जमीन संपादनाच्या  प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्या नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बांधकाम विभाग अभियंता प्रकाश चव्हाण यांनी यावेळी या नियोजित सागरी राज्य महामार्गाऐवजी या मार्गाला 2016 मध्ये राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली असून राज्य मार्ग की राष्ट्रीय मार्ग यावर निर्णय झाल्यानंतर त्याप्रमाणे जमीन संपादनाचे काम करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जोपर्यंत यावर ठाम निर्णय होऊन बाधित जमिनीच्या भरपाईबाबत  स्पष्ट  करण्यात  येत नाही तोपर्यंत जमीन संपादनासाठी सुद्धा आमचा विरोध राहील, असे स्पष्ट केले.