होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’चे भाडोत्री गुंड दहशत निर्माण करताहेत 

‘स्वाभिमान’चे भाडोत्री गुंड दहशत निर्माण करताहेत 

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 23 2018 11:07PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

जिल्ह्यातील शिवसेनेच्या दरार्‍यासह बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सेनेच्या अंगावर सोडलेले नाही. मित्रपक्ष इतक्या खालच्या थराला जाणार नाही, असा विश्‍वास सेनेचे खा.विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. मात्र, त्याचवेळी स्वाभिमानचे नीलेश राणे भाडोत्री गुंडांना राजकीय आश्रय देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला.

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेना-भाजप युतीत वितुष्ट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे येथील वर्चस्व कमी व्हावे, म्हणून सत्तेतील मित्रपक्षाने स्वाभिमानला सेनेच्या अंगावर सोडले असावे, असा संशय वाटतो का? या प्रश्‍नावर खा.राऊत यांनी मित्रपक्षावर विश्‍वास व्यक्‍त केला. मात्र, नीलेश राणे राजकीय आश्रय घेवून शिवसेना नेत्यांच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करत आहेत, असा आरोप केला. या राणे पुरस्कृत झुंडशाहीमुळे जिल्ह्याच्या वैचारिक, सामाजिक, शांततामय संस्कृतीला तडा जात असल्याचेही खासदार म्हणाले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांपासून गेल्या चार वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा कसा आहे हे दाखवून दिले आहे. वैचारिक, सकारात्मक आणि विकासात्मक मुद्यांनाच येथील मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. याचा अनुभव असतानाही नीलेश राणेंच्या गुंडानी धुडगूस घालणे सुरूच ठेवले आहे. राजकीय, सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी ‘स्वाभिमान’ने सुरू केलेल्या कृत्याची दखल पोलिस यंत्रणा नक्‍कीच घेईल, असा विश्‍वासही खा.राऊत यांनी यावेळी व्यक्‍त केला. 

घरात घुसून मारण्याची भाषा, तोडफोड, मारहाण करून ‘स्वाभिमान’चे गुंड दहशत निर्माण करीत आहे. शिवसेनेला वाकड्यात जायचे नाही. विकासात्मक, समाजसेवेचे राजकारण करणारी शिवसेना ‘वाघाची औलाद’ आहे. तेव्हा संयम ढळेपर्यंत अंत पाहण्याचे धाडस करू नये, असा इशाराही खा. विनायक राऊत यांनी दिला. एका माजी खासदारांना अशी कृत्य शोभादायक नाहीत, असा सभ्य चिमटासुद्धा खासदारांनी काढला. 

यावेळी जि.प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, सेना नेते किरण सामंत, शिल्पा सुर्वे यांच्यासह इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.