होमपेज › Konkan › सर्पमित्रांना शासनाकडून विमा संरक्षण गरजेचे : रम्युलस व्हिटेकर

सर्पमित्रांना शासनाकडून विमा संरक्षण गरजेचे : रम्युलस व्हिटेकर

Published On: Jan 28 2018 5:15PM | Last Updated: Jan 28 2018 5:15PM



महाड : विशेष प्रतिनिधी

साप पकडणे आणि ते सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडणे हे काम सर्पमित्र स्वयंसेवी वृत्तीने करीत असतात. यात अनेक धोके आहेत. त्यामुळे या सर्पमित्रांना शासनाने विमा सुरक्षा दिली पाहिजे, मात्र त्यासाठी या क्षेत्रात काम करणार्‍या सर्व संस्थांनी एकत्र येऊन या मागणीचा पाठपुरावा करायला हवा, अशी भूमिका मद्रास क्रोकोडाईल बँकेचे संचालक पद्मश्री रम्युलस व्हिटेकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मांडली.

सापापासून माणसाला कधीही धोका नसतो. मात्र, त्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो स्वसंरक्षणासाठी आक्रमक होतो आणि दंश करतो. भारतात सर्पदंशाने होणार्‍या मृत्यूपैकी अनेक मृत्यू हे मानवाच्या चुकांमुळेच होत असतात. त्यामुळे सापांना डिवचणे किंवा सापांशी खेळणे टाळले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

सर्पमित्रांनी केवळ साप पकडणे आणि ते सुरक्षित ठिकाणी सोडणे यातच आपली इतिकर्तव्यता न मानता, सापांबद्दल समाजाचे प्रबोधन करून, त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज आणि अंधश्रध्दा दूर करण्याचे काम साप पकडतानाच केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

साप समोर दिसला तर गडबडून न जाता, 'गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट' या न्यायाने वर्तन केल्यास सापांपासून माणसाला कोणत्याच प्रकारचा धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

२६ जानेवारी रोजीच रॅम्युलस व्हिटेकर यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला आहे. आपण हा पुरस्कार स्वीकारण्यास तयार आहात का, अशी विचारणा केंद्रिय गृहमंत्रालयाकडून करण्यात आली, त्यावेळेस क्षणभर आपण गोंधळलो. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद तर झालाच, पण एक नवा उत्साह देखील प्राप्त झाला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मी जन्माने अमेरिकन आहे. माझ्या लहानपणीच माझ्या आईवडिलांबरोबर मी भारतात आलो. आता मी पक्का भारतीय आहे, आणि त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले.