Mon, Jan 21, 2019 09:00होमपेज › Konkan › प्राचार्य वाद मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

प्राचार्य वाद मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

Published On: Mar 14 2018 6:42PM | Last Updated: Mar 14 2018 6:42PMमहाड (रायगड) : प्रतिनिधी

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रचार्य पदासंदर्भातील वादाबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्याची चौकशी पोलिसांमार्फत सुरू झाली आहे अशी माहिती भाजपाचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांनी आज महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ.धनाजी गुरव यांना संस्थेने बडतर्फ केलेले असताना, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रजली सोनावणे, सहा.पोलीस निरिक्षक आचरेकर, उपनिरिक्षक  मलिक यांनी अन्य पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाची मदत धेऊन त्‍यांना प्रचार्यपदाचा ताबा दिल्याचा आरोप आंग्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी सर्व संबंधितांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधिकार्‍यांनी बेकायदेशीरपणे डॉ.धनाजी गुरव यांना महाविद्यालयाच्या प्रचार्यपदाचा ताबा दिल्यासंदर्भातील एक याचिका भारिपचे नेते भीमराव आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची बाब पत्रकारांनी आंग्रे यांच्या निदर्शनास आणून दिली असता, आंबेडकर यांचा पिपल्स एज्युकेशन सोसायटीशी संबंध नाही आणि अशा प्रकारची याचिका दाखल असल्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

धर्मादाय आयुक्तांकडे पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मोरे यांचीच नोंद असून, तेच अधिकृत अध्यक्ष असल्याचा दावा आंग्रे यांनी केला. सध्या या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहात असलेले रामदास आठवले हे भाजपा आघाडीत आहेत. आपण त्यांना अध्यक्ष मानित नाही का? या प्रश्नावर, आपण या प्रश्नावर कोणतेहि भाष्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारांना आळा बसावा, येथील शैक्षणिक वातावरण चांगले रहावे यासाठी आपण ही भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.