होमपेज › Konkan › महाड : आगीत १२ बकर्‍या, २ बैलांसह १ रेड्‍याचा मृत्यू 

महाड : आगीत १२ बकर्‍या, २ बैलांसह १ रेड्‍याचा मृत्यू 

Published On: Apr 24 2018 5:11PM | Last Updated: Apr 24 2018 5:11PM महाड : प्रतिनिधी 

महाड तालुक्यातील टोल बुद्रुक या गावातील मोहम्मद सल्लेह हुरजुक या शेतकऱ्याच्या रस्त्यालगत असलेल्या वाडयाला लागलेल्या भीषण आगीमध्ये १२ बकर्‍यांसह २ बैल व १ रेडयाचा  दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीची झळ बसलेल्‍या २ म्हशीही अत्यवस्थ अवस्थेत आहेत. आगीचे कारण अद्‍याप प्राप्त होऊ शकलेले नाही.

महाड शहरापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खाडीपट्ट्यातील टोळ बुद्रुक या गावी आज दुपारी दोनच्या सुमारास गावा पासून एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या मोहम्मद सल्लेह हुरजुक या शेतकर्‍याच्या मालकीच्या वाड्याला अचानक आग लागली. या आगीत १२ बकर्‍यांसह २ बैल आणि एका रेडा या प्राण्यांचा भाजून होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती टोल बुद्रुकचे सरपंच अस्लम जलाल यांनी प्रतीनिधीशी बोलताना दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना सरपंच श्री जलाल यांनी स्पष्ट केले की दुपारी दीड वाजता श्री महमद हुरजूक जेवण्यासाठी घरी गेले असता, दुपारी  दोनच्या सुमारास बंद असलेल्या वाड्यातून धुर येवु लागल्याने रस्त्यावरील ग्रामस्थांनी तातडीने केलेल्या आरडाओरडीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या कामी येथील ज्येष्ठ सामाजिक नेते श्री बाबूशेठ जलाल यांच्या पाण्याच्या टँकर  तातडीने  घटनास्थळावर दाखल झाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाड्यांमध्ये होरपळलेल्या अवस्थेत असलेल्या दोन म्हशींना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले असुन, त्यांच्यावर  पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

या आकस्मिक आगीची माहिती महाड तहसील तसेच महाड तालुका पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. आगीच्या पंचनाम्यासाठी महसूल प्रशासनाने संबंधित गावाच्या मंडल निरीक्षक व तलाठय़ांना आदेश दिल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे . 

श्री मुहम्मद हुरजूक शेती व्यवसाय करीत असुन, त्यांच्या गावालगतच असणाऱ्या वाड्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून  बकऱ्या म्हशी रेडे यांचे पालन ते करीत आहेत. या वाड्याला लागलेल्या आगीने झालेल्या नुकसानीबाबत टोल बु.मधील ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच असलम जलाल यांनी शासनाकडे केली आहे.