Tue, Mar 26, 2019 20:20होमपेज › Konkan › कोकण पदवीधर संघाच्या निवडणुकीत आश्‍वासनांचा पाऊस

कोकण पदवीधर संघाच्या निवडणुकीत आश्‍वासनांचा पाऊस

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 8:50PMचिपळूण : खास प्रतिनिधी

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून आश्‍वासनांचा वर्षाव सुरू आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणार, पदवीधरांची बेरोजगारी संपविणार, या आणि अशा अनेक आश्‍वासनांचा पाऊस मतदारांवर पाडला जात आहे. 

गुजरातच्या हद्दीपासून ते गोव्याच्या सीमेपर्यंत विस्तारलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. यामध्ये प्रमुख लढत भाजपचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे व राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांच्यामध्ये आहेत. निवडणुकीत एकूण अकरा उमेदवार आहेत. मात्र, प्रमुख लढत या तीन उमेदवारांमध्येच आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोशल मीडिया, दूरध्वनी, एसएमएस आणि प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देण्यात येत आहे. त्याच पद्धतीने विविध माध्यमांतून पदवीधर मतदारांवर आश्‍वासनांचा पाऊस पाडला जात आहे. 90 हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघामध्ये ठाणेमधीलच तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ठाणे, पालघरमधील मतांचे मोठे विभाजन होणार आहे. त्यात शिवसेना प्रथमच पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवत असल्याने सेना-भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसर्‍या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादीने समविचारी पक्षांबरोबर आघाडी करीत मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मतदारांसमोर अनेक आश्‍वासने ठेवली आहेत. ते भाजप सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. नवी मुंबई येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र, पालघरसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ, कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ, पदवीधरांना रोजगार अशी आश्‍वासने दिली आहेत.

दुसर्‍या बाजूला सेनेचे उमेदवार संजय मोरे यांनीदेखील आश्‍वासनांचा पाऊस पाडला आहे. कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ, उपकेंद्र, पदवीधरांना रोजगार याच पद्धतीने राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनीदेखील अनेक आश्‍वासने दिली आहेत. दर सहा वर्षांनी होणारी ही निवडणूक यावेळी प्रथमच चर्चेत आली आहे.  निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीने निवडणूक प्रतिष्ठेची केली, तर दुसर्‍या बाजूला भाजपनेदेखील डावखरे यांनाच उमेदवारी देत हातातून गेलेला मतदारसंघ पुन्हा ताब्यात आणायचा असा निश्‍चय केला आहे. त्यामुळे याही निवडणुकीत विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. अखेरच्या टप्प्यात मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.