Mon, Aug 19, 2019 09:29होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा भामटा गजाआड

सिंधुदुर्ग : नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा भामटा गजाआड

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 24 2018 1:24AMसावंतवाडी : शहर वार्ताहर

राणे कुटुंबीयांच्या नावाखाली जिल्ह्यात अनेकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या भामट्याला बुधवारी सावंतवाडीत ताब्यात घेण्यात आले. राणे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. बांधकाम विभाग व हॉस्पिटलमध्ये नोकरीस लावतो, असे सांगून लाखो रुपये उकळणार्‍या या भामट्यास स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचत ताब्यात घेतले. त्याला सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी सुनील दत्ताराम गावडे (रा. वागदे, ता. कणकवली) या संशयिताविरोधात सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी गौरेश अर्जुन गावकर,सोनुर्ली यांनी तक्रार दिली आहे. गौरेश यांना भामट्यानेबांधकाम विभागात नोकरीस लावतो,असे सांगून सहा लाख रुपये उकळले होते. गेले काही महिने हा भामटा राणेंच्या हॉस्पिटलमध्ये, नोकरी लावतो, असे सांगून पैसे उकळत होता.त्याचप्रमाणे बांधकाम खात्यात अभियंता म्हणून कामाला लावतो असे सांगून सोनुर्ली येथील गावडे यांच्याकडूनही त्याने लाखो रुपये उकळले होते.राणे कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत,असे सांगून जिल्ह्यात या भामट्याने अनेकांना लाखो रुपयाना गंडा घालण्याचे काम सुरूच ठेवले होते.याबाबत स्वाभिमानाच्या पदाधिकार्‍यांशी अनेकांच्या तक्रारी आल्यावर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब व सहकार्‍यांनी बुधवारी सापळा रचला.एका युवकाला या भामट्याकडे पाठवून आपणास नोकरीची गरज आहे,असे सांगितल्यावर भामटा अलगद जाळ्यात सापडला.

तालुकाध्यक्ष संजू परब, किरण सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, केतन आजगांवकर, समीर पालव,  लवू नाईक, अमित गवंडळकर आदी स्वाभिमानच्या पदाधिकार्‍यांनी संबंधित भामट्यास येथील कार्यालयात बोलावून त्याला ताब्यात घेण्यात आले.यावेळी आक्रमक झालेल्या स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपही दिला. दरम्यान, त्या भामट्यास स्वाभिमानच्या पदाधिकार्‍यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.त्याची पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली.याबाबत तक्रारदारांची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या भामट्याने जिल्ह्यात अनेकांना 28 लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारा हा संशयित परिसरात अनेक कारनाम्यासाठी प्रसिद्ध असल्याचे समजते.एका ग्रा.प.मधील बडतर्फ क्लार्क असलेल्या या भामट्याने बनावट पावती पुस्तके छापून ग्रा.प.ला.लाखो  रुपयांचा चुना लावला होता. खोट्या जमीन व्यवहारातही तो सहभागी असल्याचे समजते.