Wed, May 22, 2019 14:33होमपेज › Konkan › लोकप्रतिनिधींना गृहित धरण्याची पद्धत सोडून द्या!

लोकप्रतिनिधींना गृहित धरण्याची पद्धत सोडून द्या!

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:18PMमालवण : प्रतिनिधी 

मालवण  नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत नगरसेवकांना सभेची टिपणी न दिल्याने संतप्त नगरसेवकांनी प्रशासनास चांगलेच फैलावर घेतले. नगरसेविका पूजा करलकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नितीन वाळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना गृहीत धरण्याचे सोडून द्यावे असे सुनावले.

पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मंदार केणी, यतीन खोत, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, पंकज सादये, पूजा करलकर, पूजा सरकारे, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, मुख्याधिकारी रंजना गगे आदी उपस्थित होते. 

शहरातील चिवला बीचच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी एलईडी लाइट  उभारणी कामास मुदतवाढ आणि मूळ आराखड्यात बदल करणे या विषयासाठी ही विशेष सभा घेण्यात आली. नगरसेविका पूजा करलकर यांनी ठेकेदाराला मुदत वाढ देण्यास आणि मूळ आराखड्यात बदल करण्याच्या आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. सभागृहात या विषयावरील दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. 
नगराध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर पूजा करलकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याशी बोलत होते. यावेळी नगरसेविका सेजल परब यांनी सभा संपली असताना आता चर्चा कशाला? अशी विचारणा केली. यावर संतप्त झालेल्या उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी आम्ही नगराध्यक्षांशी चर्चा करताना अन्य सदस्यांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे सुनावले. हा वाद वाढण्याची चिन्हे होती. त्यामुळे नगराध्यक्षांनी खुर्चीवरून उठत नगरसेवकांसोबत बसणे पसंत केले.  त्यामुळे हा वाद टळला.  माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्वच्छता अभियानात पालिकेचा सहभाग असल्याने किनारा स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करणे तसेच सर्व नगरसेवकांनी यात आपला सहभाग देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. 

शासनाचा निधी मागे जाऊ नये यासाठी ठेकेदाराने मागणी केल्याप्रमाणे दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी असे गटनेता गणेश कुशे यांनी सांगितले. नितीन वाळके यांनी चिवला वेळावर अजून 65  लाईट बसविल्यानंतर संपूर्ण किनारपट्टी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे असे सांगितले. चिवला वेळ येथील संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची आवश्यकता काय? एकाच ठिकाणी किती निधी खर्च करणार? यापूर्वी चिवला वेळ याठिकाणी बसविण्यात आलेल्या लाइटचे काय झाले? शहरात बसविण्यात आलेल्या 2200 एलईडीपैकी 300  एलईडी कुठे गेले? असे प्रश्‍न करत सौ. करलकर यांनी मुदतवाढीस आपला विरोध दर्शविला.