होमपेज › Konkan › ‘महाराजा’ चित्रपटात झळकणार कोकणातील कलाकार

‘महाराजा’ चित्रपटात झळकणार कोकणातील कलाकार

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 25 2018 12:07AMदेवरूख : नीलेश जाधव

मराठी चित्रपट दिग्दर्शकांनादेखील कोकणातील निसर्गसौंदर्याची भुरळ पडली आहे. मुंबईस्थित दिग्दर्शक रमेश मोरे यांच्या ‘महाराजा’ या मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणातील म्हणजेच संगमेश्‍वर तालुक्यातील कडवई येथे नुकतेच पार पडले. या चित्रपटात कोकणातील कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे संगमेश्‍वर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती दिलीप सावंत व कडवई येथील मिलींद चव्हाण यांनाही या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. 

रमेश मोरे हे मुंबईमध्ये राहणारे आहेत. असे असतानाही त्यांना कोकणातील निसर्गसौंदर्याची ओढ स्वस्त बसू देत नाही. आपल्या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात व्हावे, असे त्यांना मनोमन वाटत असते. ते जणू कोकणाच्या प्रेमातच पडले आहेत. कोकणाच्या प्रेमापोटी व येथील निसर्गसौंदर्याच्या ओढीमुळे त्यांनी चंद्रप्रभा एंटरटेनमेंटच्या माध्यमातून स्वत: दिग्दर्शित केलेल्या ‘महाराजा’ या मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण ‘कडवई’ परिसरात केले. या चित्रपटात रमेश मोरे यांनी कोकणातील कलाकारांना प्राधान्य देऊन त्यांना एकप्रकारे या चित्रपटाच्या माध्यमातून झळकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या मिळालेल्या संधीचे सोने करून कोकणातील कलाकारांनीदेखील या चित्रपटात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. 

कोकणात चांगले कलाकार आहेत. परंतु, त्यांना संधी मिळत नसल्यामुळे ते काहीअंशी मागे पडले आहेत. अशा कलाकारांना चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणून त्यांना हक्‍काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा रमेश मोरे यांचा प्रामाणिक उद्देश आहे. या कलाकारांकडून चांगला अभिनय करून घेणे, यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याने कोकणातील कलाकाररूपी हिर्‍यांना आपल्या चित्रपटात घेऊन त्यांना पैलू पाडण्याचे काम रमेश मोरे करीत आहेत. कडवई परिसरातील कलावंत डॉ. भगवान नारकर यांच्या माध्यमातून रमेश मोरे हे कडवई परिसराच्या व खासकरून कोकणाच्या प्रेमात पडले. चित्रपटात दाखवण्याजोगे हवे असणारे निसर्गसौंदर्य कोकणात असल्याने कोकणालाच त्यांनी आपल्या चित्रपटासाठी पहिली पसंती दिली आहे. 

नमन कलेवल शॉर्टफिल्म

चित्रपटाबरोबरच कोकणातील ‘नमन’ या कलेवर रमेश मोरे यांनी नुकतीच एक शार्ट फिल्म बनवली आहे. या शॉर्ट फिल्मचे संपूर्ण चित्रीकरण संगमेश्वर तालुक्यातीलच तुरळ हरेकरवाडी येथे करण्यात आले आहे. अशा प्रकारे कोकणातील निसर्गसौंदर्य व स्थानिक कलाकार यांना पुरेपूर संधी देण्याचे काम श्री. मोरे यांनी केले आहे. 

 

Tags : Devrukh, Devrukh news, Maharaja film, local Konkan artists,