होमपेज › Konkan › बालकांचे बालपण हरवत चाललंय

बालकांचे बालपण हरवत चाललंय

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:37PM

बुकमार्क करा

 

रत्नागिरी : प्रतिनिधी

घराघरांतला सुसंवाद कमी होत चालला आहे. बालकांवरील संस्कार हरवले जात आहेत. इंटरनेटचं नवं खूळ डोक्यात घेऊन घरातील प्रत्येकजण सदान्कदा चॅटिंग करण्यात व्यस्त आहे. भरलं मन मोकळं करायला कुटुंबात जो तो विसरत चालला आहे. एकमेकांच्या प्रेमाला पोरका झाला आहे. यामध्ये बालकांचे बालपण हरवले जाऊन घरपण संपत चालले आहे, असे मत साहित्यिक प्राचार्य सुनील दबडे यांनी व्यक्‍त केले.

न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी व जागुष्टे हायस्कूल कुवारबाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित दुसर्‍या बालकुमार साहित्य संमेलन गुरूवारी जागुष्टे हायस्कूलमध्ये थाटामाटात पार पडले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून दबडे बोलत होते.

पुढे बोलताना दबडे म्हणाले की, सध्याच्या गतिमान युगात नोकरी-धंद्याच्या मागे पालक धावत आहेत. भौतिक सुधारणा करून घर सुधारले जात आहे, पण बालकांकडे दुर्लक्ष होत आहे. घरातली आई सायंकाळच्या वेळेला दूरदर्शनवरील मालिका बघण्यात व्यस्त, वडील मोबाईलवर बोलण्यात दंग आणि घरातील मोठे भाऊ किंवा बहीण चॅटिंगमध्ये गुंग, घरातले बालक मात्र या सर्वांकडे हाताची घडी घालून चूपपणे पाहत आहे. त्यामुळे बालकांचे भावविश्‍व हरवले आहे. बालक हाच खरा प्रत्येक घराचा बँक बॅलन्स आहे. याचा विचार करून प्रत्येक पालकाने आपापल्या पाल्यांशी सुसंवाद वाढवावा. त्याला तणावमुक्‍त जीवन जगू द्यावे. सर्वांनी एकत्रित भोजन घ्यावे व वेळ मिळेल तेव्हा बाहेर फिरायला जावे. त्यांची वाचनाची गोडी वाढवावी. त्याला पुस्तक विकत घेऊन द्यावे. घरसंसार सांभाळून घरात चांगल्या पुस्तकांचे पारायण करावे, म्हणजे प्रत्येकाला नारायण भेटेल. ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे, बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटनही सुनील दबडे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी कवी संमेलनातील विद्यार्थ्यांना कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष गिरी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांना काव्य लेखनाचे, काव्य वाचनाचे तंत्र दबडे यांनी सांगितले. आपल्या आवाजाने, वाचनाने आणि काव्य गायनाने दबडे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी ‘शब्दस्नेह’ या विद्यार्थ्यांच्या कविता हस्त लिखिताचे प्रकाशन सुनील दबडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीने कुवारबाव-रत्नागिरी परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होता.