Mon, Jan 27, 2020 11:18होमपेज › Konkan › संगमेश्‍वरात कुष्ठरोग नियंत्रणात

संगमेश्‍वरात कुष्ठरोग नियंत्रणात

Published On: May 19 2019 1:33AM | Last Updated: May 18 2019 11:31PM
देवरूख : सागर मुळ्ये

कुष्ठरोग हा महाभयंकर असा रोग आहे. त्याच्या लागणीने शरीरावर चट्टे येण्यासह जखमा होऊन शरीर हळुहळू कमकुवत होत जाते. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने चांगली औषधप्रणाली निर्माण करून व जनजागृतीद्वारे गत 25 वर्षात चांगले काम झाले आहे. यातून सदैव फैलावणारा हा आजार नियंत्रणात आला आहे. या आजाराचे संगमेश्‍वर तालुक्यात गतवर्षी 8 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 2 रूग्ण पूर्णपणे बरे झाले असून  6 रूग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांचा आजार नियंत्रणात आहे.

1960 च्या दशकात कुष्ठरोगाचे प्रमाण खूपच होते. हा हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीलाही हा आजार जडतो. या आजाराने अनेक रूग्ण त्या काळात मृत्यूमुखी पडले असून अनेक रूग्ण या आजाराच्या यातना  भोगत होते. या आजाराचा सामना करण्यासाठी शासनाने त्या आजाराचे बीज नाहीसे करण्यासाठी औषधोपचारांचा शोध लावला. यात शरीर आतून शुध्द करण्यासाठी औषधोपचार तसेच रोगाच्या चट्यांवर व जखमांवर मलम तसेच पावडरची निमिती केली आहे. 

या औषधाच्या नियमित वापरामुळे आजाराची लागण संशोधनातून कमी झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शासनाने या औषधोपचारांच्या जोरावर कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला. शासनाने संशोधनातून आणलेल्या औषधांच्या निर्मितीवर  मोठा भर दिला. औषधांचा परिपूर्ण साठा झाल्यावर कुष्ठरोगाबाबत जनजागृती सुरू केली. यात ग्रामीण रूग्णालय ते प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांमध्येही  या आजाराचे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी रूजू केले. 

तालुक्यात आरोग्य कर्मचार्‍यांना घरोघरी जाऊन जनतेच्या शरीराची तपासणी करण्याचे कामकाज सुरू केले. एकीकडे जनजागृती तर दुसरीकडे तपासणी, औषधोपचार व कुष्ठरोग लागण झालेल्या व्यक्तींवर आरोग्य विभागाने करडी नजर ठेवली. असे असतानाही काही छुपे कुष्ठरोगी आढळून आले नाहीत. अखेर शासनाने रोगाची लागण होण्याची कारणे, त्यावरील उपाययोजना याबाबत पत्रके  वाटून सार्व. ठिकाणी त्याचे फलकही प्रसिध्द केले. 

दरम्यानच्या काळात या आजाबाबत जनतेत व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण करण्यात आली. येणार्‍या रूग्णांना रूग्णालयांमध्ये स्वतंत्र खोलीत ठेवून त्यांचे उपचार सुरू केले. मोठी लागण असणार्‍या रूग्णांना रूग्णालयातच दाखल ठेवून वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली उपचार करून या रोगाचा 99 टक्के समूळ नाश केला. 

गत 25 वर्षांचा विचार करता अत्यंत दुर्गंधीत काम करणारे तसेच कचर्‍याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला ही लागण क्वचितच दिसून येते. याचे प्रमाणही अत्यल्प आहे. 

संगमेश्‍वर तालुक्याचा विचार करता गत वर्षामध्ये वांद्री प्रा. आ. केंद्रात 1, कोंडउमरे 1, धामापूर 1,  माखजन 1, साखरपा 1  व कडवई 3 अशा प्रकारे 8 रूग्ण आढळून आले. या रूग्णांवर उपचार त्वरित झाल्याने साखरपा व वांद्री येथील रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. हे यश येथील आरोग्य यंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी सेवाभावी वृत्तीने केलेल्या कामाची पोचपावती आहे. गत पाच वर्षात सन 2014 ते 2018 या वर्षात 69 रूग्ण आढळून आले. यातील 26 रूग्ण पूर्णपणे बरे झाले. उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  शासनाने संपूर्ण देशातून हा आजार बरा करण्यासाठी घेतलेली कुष्ठरोग नियंत्रणाची कामगिरी सफल यशस्वी  ठरत आहे. या पुढेही कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर चट्टा आढळल्यास त्याचे निदान करून घ्यावे, असा सल्लाही तालुका आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.