Tue, Jul 07, 2020 08:29होमपेज › Konkan › मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याचा धुमाकूळ

मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याचा धुमाकूळ

Published On: Jul 17 2019 2:06AM | Last Updated: Jul 16 2019 11:11PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून, गेल्या दोन-अडीच महिन्यात चार वेळा बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी रात्री रत्नागिरीहून गणेशगुळे येथे घरी निघालेल्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला चढवल्याने एक तरुण जखमी झाला तर एकजण थोडक्यात बचावला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट पसरले आहे.

या घटनेमध्ये मेर्वी खर्डेवाडी येथील मंगेश विठ्ठल खर्डे (37) हा तरुण जखमी झाला आहे. तर त्याचा सहकारी संतोष हा सुदैवाने बचावला.  फिनोलेक्स कंपनीत काम करणारे मंगेश खर्डे हे आपला मित्र संतोष याच्यासह गणेशगुळे येथील आपल्या घरी निघाले होता. ड्युटी संपल्यानंतर रात्री दोघेही घरी जात असताना गणेशगुळे स्टॉप येथे बिबट्या रस्त्याच्या डाव्या बाजूला दबा धरून होता. दुचाकी वेगाने जात असतानाच त्याने दुचाकी चालकावर हल्ला चढवला. यावेळी गाडी थोडी पुढे गेल्याने बिबट्याचा पंजाब दुचाकीवर मागे बसलेल्या मंगेश खर्डे यांच्या वर बसला. संतोष याने गाडी न थांबवताच पुढे नेल्याने दोघेही बचावले. हल्ला केल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. या घटनेमध्ये मंगेश खर्डे यांच्या डाव्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी या अनपेक्षित हल्ल्यामुळे भितीच्या छायेखाली दिसत होते. 

मेर्वी पंचक्रोशीतील हा चौथा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वीच मावळंगेकडून गणेशगुळेकडे येणार्‍या रस्त्यावर बिबट्याने दुचाकीवर हल्‍ला चढवून दोघांना जखमी केले होते. यापूर्वीही दीड महिन्याच्या कालावधीत मेर्वी बसस्टॉपजवळ एका महिलेवर व एका दुचाकीस्वारावर हल्‍ला केला होता.

या बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पाचजण जखमी झाले आहेत. मावळंगे, मेर्वी, गणेशगुळे मार्गावरच हा बिबट्या फिरत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. वनविभागाकडून या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी काहीच पाऊले उचलले जात नसल्यामुळे नाराजी व्यक्‍त होत होती. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी येऊन फक्‍त विचारपूस करतात. उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात देतात, मात्र बिबट्याच्या बंदोबस्तासाठी काहीच करताना दिसत नाहीत. एकाद्या व्यक्‍तीचा जीव बिबट्याने घेतल्यानंतरच त्याला पकडणार काय? असा प्रश्‍न ग्रामस्थांमधून व्यक्‍त केला जात आहेत.

रत्नागिरी शहर, मिरजोळे एमआयडीसीसह फिनोलेक्स कंपनीत काम करण्यासाठी मेर्वी, गणेशगुळे, ठिकाण चक्रदेव, मावळंगे भागातून अनेक तरुण जात असतात. रात्री आठनंतर यातील अनेकजण घरी परततात. त्यामुळे बिबट्याची दहशत सर्वांच्याच मनात बसली आहे. सोमवारी पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी अधिकार्‍यांना पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानंतर दुपारी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आला.