Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Konkan › नवजात अर्भकांसह महिलांना रुग्णवाहिकेतून अर्ध्यात उतरविले

नवजात अर्भकांसह महिलांना रुग्णवाहिकेतून अर्ध्यात उतरविले

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 10:17PMखेड : प्रतिनिधी

नवजात अर्भकासह प्रसूती झालेल्या महिलेला 108 रुग्णवाहिका चालकाने तिच्या घरी सोडण्याऐवजी अर्ध्या रस्त्यातच सोडल्याचा धक्‍कादायक प्रकार खेड तालुक्यातील दस्तुरी येथे घडला आहे. याची माहिती मिळताच युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांनी तत्काळ बसची व्यवस्था करुन या महिलेची सुखरुप घरी पाठवणी केली. मात्र, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकाबाबत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

मंडणगड तालुक्यातील जावळे येथील उर्मी उमेश भानसे, दहागाव येथील आशा गणेश जाधव आणि चिंचाळी म्हाप्रळ येथील सुमन दगडू मुकणे या महिलांची दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर त्यांना नवजात अर्भकांसह अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीहून त्यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मंडणगडच्या दिशेने नेण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिका चालकाने या ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत खेड तालुक्यातील दस्तुरी येथे महिलांना बाळांसह सोडले. भर पावसात या महिलांनी जवळच्या वडापावच्या टपरीत आधार घेतला. येथील ग्रामस्थांना ही माहिती मिळताच त्यांनी युवा सेनेचे योगेश कदम यांना कल्पना दिली. यानंतर विषय लक्षात घेऊन त्यांनी तातडीने खेड येथील योगिता दंत महाविद्यालयाची बस दस्तुरी येथे पाठवून दिली व अर्भकांसह महिलांची घरी सुखरुप पाठवणी केली.

चालकाची चौकशी व्हावी
नवजात बालकासह महिलेला रत्नागिरीहून 108 रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्यांना अर्धवट सोडले. त्यामुळे संबंधित चालकाशी चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी खेड व मंडणगडमधून होत आहे. जि. प. च्या आरोग्य सभापती व जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांनी याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.