Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Konkan › रेल्वेच्या धडकेने वेरवली खुर्द येथील महिला ठार 

रेल्वेच्या धडकेने वेरवली खुर्द येथील महिला ठार 

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:02PMलांजा : प्रतिनिधी 

दिल्लीहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या राजधानी एक्सप्रेस रेल्वेची धडक बसून वेरवली खुर्द येथील 42 वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वा. घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेरवली खुर्द येथील सुवर्णा अंकुश बेंडळ (42) या आपल्या मालकीची जनावरे चारण्यासाठी वेरवली खुर्द मांडवकरवाडी येथील बोगद्याजवळ गेल्या होत्या. दिल्लीहून गोव्याच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेसची जोरदार धडक बसली. या अपघाता मध्ये सुवर्णा हिच्या अंगावरून रेल्वे गेल्याने शरीराचे दोन भाग झाले होते. 

अपघात झाल्यानंतर राजधानी एक्सप्रेस रेल्वेचे चालक यांनी विलवडे रेल्वे स्टेशन येथे खबर दिली . त्यानंतर विलवडे रेल्वे स्टेशन मास्तर यांनी आडवली रेल्वे स्टेशन येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.  

आडवली स्टेशन मास्तर यांनी  वेरवली खुर्द मांडवकरवाडी येथे कार्यरत असलेल्या रेल्वे  कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.  तात्काळ रेल्वे कर्मचारी अंकुश बेंडळ हे रेल्वे टपरीवर शोध घेत असताना त्यांना आपल्या पत्नीचा रेल्वे अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून मोठा धक्का बसला. 

या अपघाताची खबर लांजा पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक पंडित पाटील,  शांताराम पंदेरे, शशिकांत सावंत व इतर पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे रूग्णालयात  शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  अधिक तपास लांजा शहर पोलिस करीत आहेत.